You are currently viewing आंबोली घाटातील मृत महिलेच्या खुनासाठी वापरलेली स्विफ्ट कार दारू धंद्याशीच संबंधित….

आंबोली घाटातील मृत महिलेच्या खुनासाठी वापरलेली स्विफ्ट कार दारू धंद्याशीच संबंधित….

संशयित मुलांना कोलगाव येथीलच खुफिया दोन तास पुरवायचा ड्रग्स…???

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैद्य धंद्यांना उत आलेला आहे. लॉकडाऊन मध्ये सर्वच व्यवसाय बंद असताना गोवा बनावटीच्या दारूची चोरीछुपे वाहतूक मात्र जोरदार सुरू होती. सर्वत्र नाकेबंदी, जिल्हा बंदी असताना खाकीच्या मेहरबानीने दारूचा मात्र जिल्ह्यात महापूर आला. तिप्पट चौपट पैसे घेऊन जिथे पाहिजे तिथे युवकांना, कोवळ्या मुलांना हाताशी धरून बक्कळ पैशांचे आमिष दाखवून दारू पोचवली जाऊ लागली. दारूच्या वाहतुकीसाठी नवनवीन चेहरे हेरल्यामुळे कित्येक तरुण या बेकायदेशीर धंद्यात उतरले आणि आयुष्याची वाट लावून घेतली.
प्रत्येक बाप आपला मुलगा चांगले काम करावा अशा मतांचा असतो परंतु दारूच्या या अवैध धंद्यात जुन्या धंदेवाल्याने आपल्या मुलाला सुद्धा गोवले आणि त्या मुलाने कधी गाड्यांचे, तर कधी दारू मटणाच्या पार्ट्या देऊन कॉलेजमधील इतर कोवळ्या मुलांना दारूच्या धंद्यात ओढून घेतले आहे. आणि व्यसनाधीन झालेली हीच कोवळी मुले नासमज वयात व्यसनांच्या आहारी जाऊन गंभीर गुन्हे करतात आणि जीवाची होळी करून घेतात.
आंबोली घाटातील मृत महिलेसोबत लगट करण्यासाठी, अनैतिक संबंध बनविण्यासाठी दारू व्यवसायिकांचीच महागडी स्विफ्ट कार वापरण्यात आली आहे. ती कार राजकीय पक्षाच्या कोलगावातीलच एका व्यक्तीची असून त्याच्या कडून कोणी घेतली? हा प्रश्न अनुत्तरित आहे. दारूच्या व्यवसायात असणाऱ्या व्यक्तीची कार गुन्ह्यात वापरली आहे आणि दारूच्या अवैध व्यवसायात खाकीची काही माणसे हफ्ते घेऊन बरबटलेली असल्याने त्याचे नाव लपवून त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होताना प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे संशयित आरोपींवर आरोपपत्र दाखल होताना सुद्धा आरोपी सहीसलामत सुटतील असे झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.
संशयित आरोपींना कोलगावातीलच खुफिया दोन तास अशा नावाची व्यक्ती ड्रग्सचा पुरवठा करत असल्याचेही बोलले जात आहे. कोलगाव येथे राहणारी ही व्यक्ती शहरात काहींना ड्रग्स पूरवठा करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दारू व्यवसायात आलेल्या पैशातून अशी तरुण मुले ड्रग्स सारख्या अमलीपदार्थांच्या आहारी जाऊन नशेच्या जोरावर कोणतेही दुष्कर्म करण्यास मागे पुढे पाहत नाहीत.
सावंतवाडीत अलीकडे गाजत असलेले दारू, जुगार, मटका, ड्रग्स सारखे अवैध धंदे हे खाकीच्या आशीर्वादानेच सुरू असतात. जोपर्यंत खाकीचे रक्षणकर्ते आपण खाकी परिधान करताना घेतलेली शपथ आठवून जनतेच्या रक्षणासाठी काम करणार नाहीत तोपर्यंत समाजात वाईट प्रवृत्ती जन्म घेत राहणार आणि खाकीच्या आशीर्वादानेच बांडगुळासारखी वाढत जाऊन समाज पोखरण्याचे काम करतच राहणार.
आता वेळ आली आहे खाकीने आपल्या शपथेचं रक्षण करण्याची आणि वाईट प्रवृत्तीच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याची…
क्रमशः

प्रतिक्रिया व्यक्त करा