आ.दीपक केसरकर यांनी दिलेला शब्द पाळला
गेली अनेक वर्षे सावंतवाडीच्या सौंदर्यास चार चाँद लावणाऱ्या मोती तलावात साठलेला गाळ मोती तलावाच्या सौंदर्यास बाधा आणत होता. सुंदरवाडीची शान असणाऱ्या मोती तलावात चिखलाचे आणि वेलींचे साम्राज्य पसरले होते. चिखल वाळू साचून राहिल्याने पाण्याचा साठा अल्प झाला होता, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच गाळ वर दिसायचा. राजघराण्याची मालकी असल्याने तलावाच्या साफसफाई व स्वच्छतेचा प्रश्न उभा राहिला होता.
अलीकडेच राजघराण्याकडून तलाव स्वच्छतेस अटीशर्तींवर ना हरकत मिळाल्याने आज पासून तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी तलावातील गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री व डंपर देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे कालच केसरकरांच्या माध्यमातून सावंतवाडीत गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री दाखल झाली होती. आज दुपारपासून यंत्राने गाळ काढून डंपर मधून बाहेर फेकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच मोती तलावाला पूर्वीचे सौंदर्य प्राप्त होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
आ.दीपक केसरकर हे सावंतवाडी शहर विकासासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात. यापूर्वी देखील त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या, मंत्रीपदाच्या काळात सावंतवाडी शहरात आमूलाग्र असे विकासात्मक कार्य झालेलं आहे. सावंतवाडी नगरपालिकेवर नगराध्यक्ष नसून प्रशासक असल्याने आमदार केसरकर प्रशासनाकडून शहर विकास करून घेण्यासाठी आग्रही आहेत.