गोकुळधाम हॉटेल कडील गटाराचे काम सुरू
गेली तीन वर्ष रामेश्वर प्लाझा मधील नागरिकांना पावसाळ्यात सहन करावा लागत होता त्रास
हायवे चौपदरीकरण कामात ठेकेदार कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे दरवर्षी रामेश्वर प्लाझा मधील सारस्वत बँक व अन्य गाळ्यामध्ये पावसाळ्यात भरणारे पाणी या वर्षापासून बंद होण्याची आशा निर्माण झाली आहे. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यापूर्वी अनेकदा गोकुळधाम हॉटेल कडील गटाराची पाहणी केली होती. ठेकेदार कंपनीला अनेकदा त्यांनी सूचना देखील दिल्या होत्या. मात्र ठेकेदार कंपनीने 15 वर्षाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असून देखील जवळपास पळ काढल्यात जमा असल्याने अखेर नगरपंचायत च्या माध्यमातून श्री नलावडे यांनी हे काम मंजूर केले. गोकुळधाम हॉटेल नजीकच्या गटाराचे रुंदीकरण करून मोठे पाईप घालून गटारातील पाणी निचरा करण्याची उपाययोजना नगरपंचायतने केली आहे. यासाठी 12 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सकाळपासूनच प्रत्यक्षात गटार पाईप रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. कणकवलीच्या अर्ध्याहून अधिक भागातून येणारे पावसाचे पाणी व सांडपाणी रामेश्वर प्लाझा आणि हॉटेल गोकुळधाम दरम्यानच्या हायवेखालील गटारातून पुढे सुरळीत जाऊन ही समस्या मार्गी लागणार आहे. हायवे चौपदरीकरण कामात सदर गटारातून सांडपाण्याचा पुढे निचरा होत नव्हता. त्यात करून ऍड. उमेश सावंत यांच्या घराकडे बॉक्सेल मोरी चे काम हे मूळ गटारापेक्षा सुमारे एक फूट उंच करण्यात आले त्यामुळे सांडपाणी साचून राहण्याचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान कणकवली नगराध्यक्षांनी तत्परता दाखवत दिलेल्या आश्वासनाला प्रमाणे हे काम मंजूर केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.