*आईबापाचा आधार बनण्याआधी निराधार करून जातात*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही महिने नवतरूणांच्या आत्महत्यांचे प्रमाण फार वाढले आहे. १५ ते २५ वयोगटातील मुले अलीकडे आत्महत्ये सारखा मार्ग स्वीकारतांना दिसून येत आहेत. नवयुवकांच्या आत्महत्यांना नक्की कारण काय? जिल्ह्यातील तरुणांच्या आत्महत्यांना जबाबदार कोण… आई-बाप, पालक, राजकीय अनास्था की समाजव्यवस्था?
सिंधुदुर्ग जिल्हा गेली काही वर्षे शिक्षण व शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीवर असून दहावी असो किंवा बारावी बोर्ड राज्यात कोकण बोर्डातील युवक-युवती अव्वल येतात. एवढेच नव्हे तर सर्वाधिक निकाल देखील कोकण बोर्ड देत आहे. शैक्षणिक दृष्ट्या प्रगतिशील असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांच्या आत्महत्या नक्कीच प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या आत्महत्याकडे राजकीय नेत्यांचा कानाडोळा होतच आहे आणि होणारही परंतु समाजात तळागाळापर्यंत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असणाऱ्या पत्रकारांनी, वृत्तपत्रांनी याकडे कानाडोळा करून चालणार नाही. समाजातील युवकांची होत असलेली मानसिक कोंडमारी आणि त्यातून युवकांकडून घेतले जाणारे चुकीचे आणि घातकी निर्णय यापासून युवकांना परावृत्त करण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे. समाजात युवकांमध्ये जनजागरण करून त्यांची मानसिक कोंडी दूर करून युवकांना चुकीचा निर्णय घेण्यापासून परावृत्त करणे हीच काळाची गरज बनली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतरा,अठरा वर्षांच्या कोवळ्या वयातील युवकांच्या आत्महत्या मनाला चटका देऊन गेल्या. पंधरा-वीस वर्षे आई बापाने अर्धपोटी राहूनही आपल्या मुलांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपून लहानाचे मोठे केले, आपली मुले भविष्यात आपला आधार बनतील या एकाच आशेवर आईबापांनी मुलांना कर्ज काढून, गळ्यातील दागिने गहाण ठेवून, अक्षरश: स्वतःचं घर देखील गहाण ठेवून मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या. जे आपल्याला मिळाले नाही ते सर्व सुख आपल्याला आपल्या मुलांना मिळावे यासाठी राब राब राबले. परंतु ज्यावेळी ही मुले आई बापाचा आधार बनण्याची वेळ येते, त्यावेळी मागचा-पुढचा कोणताही विचार न करता मृत्यूला कवटाळतात आणि आई बापाला दुःखाच्या खाईत लोटून आयुष्यातून निघून जातात.
*काहीवेळा मनात विचार येतो खरंच यात मुलांची शंभर टक्के चूक आहे का?*
ज्यावेळी आपण शिकत होतो तेव्हा भले आपल्या गरजा कमी असल्या तरीही आपले फालतू लाड आई-वडील करत नव्हते. काबाडकष्ट करून ते देखील गरजेच्या वस्तू पूरवत होते. परंतु आज काल दहा बारा वर्षाच्या मुलांना सुद्धा दीड- दीड दोन -दोन लाखांच्या दुचाक्या, आठ-दहा लाखांच्या चार चाकी गाड्या देखील आई-वडील घेऊन देतात. मुलांच्या हातात वाटेल तसा पैसा असतो, तर काही मुले आपल्या चैनी शौक भागविण्यासाठी अवैद्य मार्गाने का होईना पैसा कमावतात, आणि व्यसनाधीन होतात. व्यसनाच्या आहारी गेलेली मुले बऱ्याचदा नैराश्याच्या खाईत लोटली जातात. त्यावेळी आपल्या मुलाची चूक आई वडील लक्षात ठेवतात, परंतु त्याला समजून घेऊन, चांगल्या मार्गावर आणण्या मध्ये कुठेतरी कमी पडतात. आणि त्यातूनच नैराश्याच्या खाईत लोटली गेलेली मुले आत्महत्येसारखा करुणास्पद निर्णय घेतात आणि शेवटी आई बापाला पश्चाताप करण्याशिवाय काहीच शिल्लक राहत नाही. कित्येकदा काही आईबापांकडून आपल्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता न पाहता त्याच्या डोक्यावर अपेक्षांचं ओझं ठेवलं जातं. अशावेळी दहावी-बारावीच्या परीक्षा मध्ये पेपर कठीण गेले की निकालाच्या अगोदर किंवा निकालानंतर मुले आत्महत्येसारखा पर्याय स्वीकारतात. खरंच अशा वेळी गरज असते आई-वडिलांच्या आधाराची, परंतु आपल्या अपेक्षाच आपल्या मुला पेक्षा कितीतरी उंच गेलेले असतात त्यामुळे नको असलेलं खोटं मोठेपण जपण्यासाठी बरेच जण आपल्या मुलांचा बळी देतात.
गेल्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारू, जुगार, मटका, सोशल क्लब अशा अवैद्य गुन्हेगारीने थैमान घातलेले आहे. अलीकडे तर अवैद्य धंदे करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गावागावांमध्ये क्रिकेटचे सामने किंवा नाटके भरवतात आणि या कार्यक्रमांच्या आडून जुगाराचे पाल टाकले जाते… मैफिली सजवल्या जातात आणि क्रिकेट सामन्यांसाठी किंवा नाटके पाहण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडलेली तरुणपिढी अशा अवैध धंद्याकडे ओढली जाते आणि पैशाच्या हव्यासापोटी घरातील दाग दागिने सुद्धा चोरून विकते. काहीवेळा या सर्व गोष्टी लपविण्यासाठी नशेच्या आहारी जाते आणि याचे पर्यावसान शेवटी आत्महत्या मध्ये होते. जिल्ह्यातील नावाजलेल्या काही राजकीय लोकांनी मटका दारू जुगार यासारखे धंदे यांमधून अवाढव्य संपत्ती जमा केलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात गोव्याची अवैद्य दारू पोचवली जाते. युवकांना हाताशी धरून *मागणी तिथे पुरवठा* या तत्त्वानुसार पुरवली जाते. त्यातून तरुणांना बक्कळ पैसा मिळतो आणि मौज मजा करण्यासाठी प्रयत्नशील असणारी तरुण पिढी या गैर धंदे वाल्यांची बळी ठरते. गुन्हेगारीकडे ओढली जाते आणि त्यातून होणाऱ्या मानहानी मुळे आत्महत्येसारखा पर्याय स्वीकारते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक राजकीय नेत्यांनी मोठमोठ्या बढाया मारल्या, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला परंतु ना पर्यटनातून, ना औद्योगीकरणातून, किंवा ना इतर लघुउद्योगातून रोजगार निर्मिती केली… किंवा जिल्ह्यात मोठे कारखाने आणले. उलट जिल्ह्यात येणाऱ्या उद्योगधंद्यांना आपल्या स्वार्थापोटी जिल्ह्याच्या सीमेवर बाहेरच रोखून धरले. त्यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षित सुसंस्कृत असलेली तरुण पिढी बेरोजगार राहिली आणि या बेरोजगारी तून अवैद्य धंद्यांमध्ये ओढली गेली. राजकीय नेत्यांच्या अनास्थेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी स्वतःच्याच घरात स्वतःच्याच आरशासमोर उभे राहून स्वतःचं कर्तुत्व आणि स्वतःची उंची तपासावी…मोजावी.. अशी परिस्थिती आज राजकीय नेत्यांवर आलेली आहे. जिल्ह्यात रोजगाराचे प्रश्न आ-वासून उभे असतानाही रोजगारासाठी आज पर्यंत कोणीही प्रयत्न केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात वाढलेली बेकारी हीदेखील आत्महत्येचे मुख्य कारण बनू शकते. जिल्ह्यात असलेल्या बेकार तरुणांचा वापर आपल्या राजकीय स्वार्थासाठी झेंडे धरणे, झेंडे लावणे, सतरंज्या उचलणे, आणि अवैद्य धंदे यांसाठी राजकीय नेतेच करत असतात. त्यामुळे जिल्ह्याचे भविष्य देखील अंधकारमय असल्याचे दिसून येत आहे. जर जिल्ह्यात अशाच प्रकारे बेकारी वाढत राहिली आणि शैक्षणिक संस्थांमधून शिकून बाहेर येत फॅक्टरी मधून माल बाहेर येतो तशी मुले जर बाहेर पडत राहिली, तर मात्र नक्कीच जिल्ह्यासाठी ती धोक्याची घंटा असू शकेल….