You are currently viewing अधिकता

अधिकता

राष्ट्रीय समाजरत्न करवीर साहित्य परिषद पुरस्कार २०२१ प्राप्त लेखिका मेघा कुलकर्णी यांचा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लिहिलेला अप्रतिम लेख

सणसमारंभ जीवनातील चैतन्य टिकवून ठेवतात, ‘अक्षय तृतीया’ हा सण तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक. वैशाख शुद्ध तृतीयेला ही अक्षय तृतीया असते. अखंडता हे याचे वैशिष्ट्य, कोणत्याही गोष्टीचा क्षय होऊ नये ही भावना आणि समृद्धीची अक्षयता. हा सण कर्नाटक राज्यामध्ये ‘आकिती’ या नावांने ओळखला जातो. मराठी वर्षांतील पहिला महिना ‘चैत्र’ नवीन पालवीच्या रूपाने प्रकटतो, नवउत्साह वातावरणात भरलेला असतो. मराठी वर्षाची सुरूवांत त्यानंतर वैशाखातील उन्हाचा तडाखा निसर्गचक्र सुरूच असते. तरीही ग्रीष्माच्या या चाहुलीत रानचा मेवा उपलब्ध होत असतो. आंबा, जांभूळ, करवंद, हिरवीगार काकडी आणि इतरही फळफळावळांची वैविध्यता जाणवत रहाते.
श्रीमहालक्ष्मींच्या वास्तव्याने पावन झालेल्या करवीर नगरीत हा ‘अक्षय तृतीया’ सण वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो. महालक्ष्मी [अंबाबाई] यांची पूजा झोपाळ्यावर बांधलेली असते, अशी विराजमान झालेल्या देवीचे दर्शन घेणेसाठी अलोट गर्दी होत असते. चैत्रगौरीच्या आगमनाने हळदीकुंकू समारंभाला झालेली सुरूवांत त्या सगळ्याचा समारोप या अक्षय तृतीया सणाच्या निमित्ताने झालेला असतो. देवदेवतांच्या मंदिरातही थोडक्या प्रमाणांत सुवासिनींना हळदीकुंकू, पन्हे, कोशिंबीरचे वाटप करून भिजलेल्या हरभऱ्यांनी ओटी भरली जाते. उन्हांतान्हांतून आलेल्या अतिथीसाठी पन्हे-सरबत ही तर पर्वणीच असते. हे सर्व लिहित असताना नकळत बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळत गेला.
शैक्षणिक वर्षाची सांगता आणि सुट्टीची सुरूवात एक वेगळीच धमाल. वेगेवेगळ्या गावांत रहाणारी आम्ही चुलत भावंडे थोड्या काळासाठी एकत्र येत असू, सांगली जिल्ह्यांतील बत्तीस शिराळा या गांवी. छोट्या गावातील ती हळदीकुंकूवाची आमंत्रणे, गोरक्षनाथांचे शांत निसर्गरम्य स्थान, तेथे भरणारी जत्रा असे सर्व आजही डोळ्यांसमोर येत रहाते. सकाळी लवकर उठून घरांतील मोठ्या स्त्रिया स्वयंपाक बनवून घेत असत. कारण नाथ मंदिरास भेट देऊन वनभोजनाचा कार्यक्रम निश्चित असायचा. त्यांत महिनाभर चालू असलेली घरोघरची चैत्रगौरीची आरास, पूजा, समारंभ या सगळ्यांनी सांस्कृतिक वातावरण पोषक ठरत असे, आजीची माया ओसंडून लाभत असे.
आज एक वेगळाच अनुभव शब्दांतून मांडता आला. निसर्गाचे बहरणे पहाता-पहाता वृक्षवेलींच्या सावलीत गारवा अनुभवायला मिळायचा. या लेखाच्या निमित्ताने एक सुचवावेसे वाटते. मनुष्यानेही निसर्गाची अक्षयता जपली पाहिजे. तरच आपल्या जीवनांतील अखंडता टिकून राहील, आणि खऱ्या अर्थाने या सणाचे मोल जाणल्याचे समाधान मिळेल.
शब्दसंख्या : ३०५
कुलकर्णी मेघा, कोल्हापूर
भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२
ईमेल – megha.kolatkar 21@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा