मुंबई :
कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या दोषींना येरवडा कारागृहातून पुढील शिक्षण सुरू ठेवण्यास उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली. दोषींची शिक्षण घेण्याची इच्छा स्वागतार्ह आहे, असे नमूद करून या दोघांच्या मागणीबाबत येरवडा तुरुंग अधिकार्यांनी मानवतावादी दृष्टिकोन दाखवून दोषींना आवश्यक मदत करावी, असे आदेश न्यायालयाने दिले.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याच्या आरोपात जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलुमे या दोघांना अहमदनगर येथील सत्र न्यायालयाने 2017 मध्ये दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. राज्य सरकारने नियमानुसार आरोपींची फाशी कायम करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे, तर शिंदे आणि भैलूमे यांनीही फाशीला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून प्रकरण प्रलंबित आहे.