You are currently viewing नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परिक्षेच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाचा निर्णय व भूमिका विद्यार्थी हिताचीच! – राजेश जाधव

नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परिक्षेच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाचा निर्णय व भूमिका विद्यार्थी हिताचीच! – राजेश जाधव

तळेरे: प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षेच्या मुद्द्यावर जिल्ह्यात वादजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याअनुषंगाने स्थानिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही, असा आंदोलनात्मक पवित्रा काहीं राजकीय संघटनांनी जाहीर केलेला होता. या पार्श्वभूमीवर ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेकशन या मानवाधिकार संरक्षण संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी आपले परखड परंतु वास्तवदर्शी मत व्यक्त केले होते. त्यास पूरक असाच निर्णय जिल्हा प्रशासनाने जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षेच्या बाबतीत घेतलेला आहे.

वास्तविकपणे, कोणतेही विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षेस प्रविष्ठ झाले अथवा उत्तीर्ण झाले, याचा अर्थ त्या विद्यार्थ्यांचा जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेश निश्चित झाला असे नाही. जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशाबाबतच्या निकषानुसार आवश्यक ती पात्रता व अहर्ता धारण करणे व त्याबाबतचे आवश्यक ते कागदोपत्री पुरावे जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेकडे विहित मुदतीत सादर करणे गरजेचे आहे. तसेच त्याबाबत आवश्यक ती सत्यता पडताळणी व शहानिशा करून जवाहर नवोदय विद्यालयामध्ये पात्र व अहर्ताधारक विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करून देणे ही सर्वस्वी जबाबदारी जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेची आहे. जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत केव्हाही व कोणताही वाद निर्माण झाल्यास त्याबाबत जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा निर्णय अंतिम असणार आहे. या सर्व बाबींचा जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेकडून नियमोचितरीत्या अवलंब झाल्यास जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता येईल व त्यामुळे कोणताही अनुचित अथवा गैर अथवा अन्यायकारक प्रकार कोणत्याही विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडणार नाही.

या सर्व बाबींचा सारासार विचार करता व जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वयोगट, मानसिकता व त्यांची अभ्यासाची मेहनत या बाबी गांभीर्यपूर्वक लक्षात घेता, सदर प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होईल असा आंदोलनात्मक पवित्रा घेणे अथवा त्यास दुजोरा देणे हे नक्कीच उचित ठरणारे नाही. याउलट शांततामय व संयमी लोकशाही मार्गाने कायदेशीर तरतुदींचा योग्य वावर करून हा वाद विषय हाताळणे व संबंधित न्यायप्राधिकरणाकडे आवश्यक ती न्यायिक दाद मागणे आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने असे झालेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वेळीच योग्य तो निर्णय घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली व जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यासाठी सहकार्य व संरक्षण दिले. सबब जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परिक्षेच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाने वेळीच घेतलेला निर्णय व भूमिका ही विद्यार्थी हिताचीच असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्याच्या मूलभूत व वैश्विक मानवाधिकारास बाधा न पोहोचण्यास मदत झाली आहे. अशी प्रतिक्रिया ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेकशन या मानवाधिकार संरक्षण संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा