You are currently viewing वासंतिक वसंत

वासंतिक वसंत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रो डॉ. जी आर उर्फ प्रवीण जोशी यांचा अप्रतिम लेख

होय ,

बघता बघता शिशिर सरला, पानगळ झाली होतीच . वसंताची चाहूल लागली होती , आम्र वृक्ष्या वर मोहर फुलला होता . त्याचा मादक वास ही आसमंतात दरवळत होताच . कोकिळेची कुहुकुहू अशी साद, अवघ्या सृष्टी ला जागे करत होतीच . राव्यांचा थवा आम्र वृक्ष्या वर सदोदित घिरट्या घालत होताच . नाजूक तांबुस, फिक्कट लाल पालवी, चहुकडे पसरत होतीच . निसर्गात नवं चैतन्य बहरत होतच . विविध वृक्ष राजी खुलून दिसत होतीच . गुलमोहोर तर फुलाला होता . त्याचे अंगनांग मदन बाणा घेऊन जाहीर वाच्यता करत होता ! भरीस भर म्हणून मोगरा व त्याचा उन्मादक सुगंध रात्री हवेत पसरत होताच . रातराणीने पण कुठलीच उणीव ठेवली नाही . तीच फुलुन येणं व रात्री चांदण असणं , जणु अमृतयोग च . तरुण्यात फुलून यावा असा शृंगार करण्यात पटाईत असलेला , मोगरा , गुलाब , व रातराणीच्या गंधाचा आव्हाहन पेलणे हीच वासंतिक वसंत हो ना !
चैत्र , चैत्रात गौरीला मंचकी बसवुन , तिचे आदरातिथ्य करायला नको का ? तिचे लाड कोड कौतुक करण्यासाठी , सुहासिनी एकत्र येतात ना !
अस जरी असले तरी एका वैराग्य वृत्तीची आठवण करून देणारा लाल जर्द पळस , बिचारा फुलण्यासाठी भर उन्हात जळत होता ते पण निष्पर्ण ! त्याच फुलुन येण हे म्हाताऱ्या आजोबासारखं वाटत होत ! आधार देणार ! तसच चाफ्याचे झाड पण ! निष्पर्ण फुलते अगदी विरक्त झालेल्या ऋषि सारखे !, पळस व आणि चाफा हे दोन्ही वसंतातील ” यतीराज ” वाटतात !
ग्रीष्म असुनही अंगावर अनेक काट्यांचे ओझे सांभाळत पिवळसर फुलांची आरास मांडणारा बाभूळ काय किंवा बहावा काय ! नवं वधुच्या
पिवळसर पोशाखात दिमाखात दोघे वसंताचे स्वागत करतातच की .
एव्हाना आम्र कैर्या ह्या झाडावर अधोमुखी होऊन , वाऱ्यावर
हेलकावे घेत , त्या सर्वांना वाकुल्या दाखवत , मिरवतात ! हाच का तो वसंत ! म्हणत असताच कोकिळेची साद मात्र आठवण करून देत असतेच ., उष्मा वाढला की तप्त अवनी अवचित अस, मेघाला आवर्तनाचे अवताण देते ! सोबत सोसाट्याचा वारा आला की , तो धूळ पाला पाचोळा उडवत हजर होताच, गर्द काळे निळे मेघ जमा होतात ते गर्जने सह ! ते अवनी ला “मी आलोय” हे सांगण्यासाठी च ना !,
मग काय विचारता क्षणात वीज चमकते व गारा व वर गार पाण्याच्या धारा एकदा बरसल्या की मग , धरती तृप्त होते, शांत होते , प्रत्येक थेंबात भिजून चिंब होते. तीच बोलवण हे पावसाला टाळता येत नाही ! त्या दोघांची गट्टी जमली की मग वसंत परत एकदा फुलून येतो च की ! काय सांगावं त्याचा राजेशाही थाट . मनात आले की मदन बाण घेऊन निसर्गाला
मोहित करण्यात तो धन्यता मानतो !
वर्षा ऋतूतील श्रावण महिना हा मुरलेल्या प्रेमी युगुलासाठी वरदान तर , वसंतातील बहार हा नव अभिसरीका साठी नवं युगुलासाठी सुरवात करणारा ! प्रेम चांदण फुलवण्यासाठीच तर त्याची किमया ! श्रावण हा भिजलेला , तर वसंत हा सजलेला ! नवं परिणीती सृष्टीची आराधना करणारा ! अस नाही का वाटत . वसंत हा अधीर तर श्रावण समंजस वाटतो . वसंत सजतो बहरतो . मृग नक्षत्राचा चा धुसमुसळे पणा , वादळी पावसासारखा वसंतात पण हजेरी लावुन जातो ! अधीरता नडते !!
अवनी तापलेली अतृप्त , तहानलेल्या अवस्थेत , गारा झेलणारी ! तर श्रावणी पाऊस निरागस तृप्त मनाचा संथ उन्ह पावसाचा लपंडाव खेळणारी भरलेल्या कलशा सारखी पवित्र , काहीशी तृप्त असुन ही अतृप्त !
असच असत का आयुष्य ! बहारायच , फुलायच , एक दिवस फुलांचा सुगंध सोडुन मातीत मिसळायच ! सहा ऋतूंचे सहा सोहळे एव्हड्या साठी च का ? सृष्टी ची नजाकतता कळण्यासाठी अवघे आयुष्य खर्ची घालावे लागते तेव्हा कुठे निसर्ग नियम कळतात . फुलणे बहरणे , गंधीत होणे सौभाग्य लेण लेणे , फलधारणा करणे , निर्माल्य होऊन , जीवनाची इतिकर्तव्यता संपवणे , हेच तर आयुष्य आहे ना !

प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी

अंकली बेळगाव

कॉपी राईट। 21 एप्रिल 2022

प्रतिक्रिया व्यक्त करा