You are currently viewing प्रलंबित 108 घरकुल संदर्भात आमदार आवाडेंनी घेतली राज्य गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांची भेट 

प्रलंबित 108 घरकुल संदर्भात आमदार आवाडेंनी घेतली राज्य गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांची भेट 

मुंबईतील बैठकीत प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा

 

इचलकरंजी :

शहरातील जयभिम झोपडपट्टीतील प्रलंबित 108 घरकुलांच्या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी मुंबई येथे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्याचबरोबर राज्य शासनाकडे सध्या झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत कोणतीच योजना नसल्याचेही आमदार आवाडे यांनी नामदार आव्हाड यांच्या निदर्शनास आणून दिले. या दोन्ही प्रश्‍नी लवकरच संबंधितांची बैठक घेऊन ते मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही नामदार आव्हाड यांनी दिली.

इचलकरंजी नगरपरिषद हद्दीतील झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी शहरातील 23 झोपडपट्ट्यांचे आहे त्याचठिकाणी पुनर्वसन होण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी पुढाकार घेतलाहोता.तसेच शासन दरबारी पाठपुरावा करत त्यासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करुन दिली होती. मात्र काही तांत्रिक गोष्टी व विरोधांमुळे ही योजना पूर्णत: साकारता आली नाही. नेहरुनगर येथे बैठी घरेच व्हावीत या अट्टाहासामुळे तेथे केवळ बहुमजली एकच इमारत पूर्ण होऊन पुढील काम थांबले. तर आमदार आवाडे यांनी दिलेला विश्‍वास आणि भागातील नगरसेवक सुनिल पाटील यांनी केलेले प्रयत्न यामुळे जयभिम झोपडपट्टीतील नागरिकांनी सहकार्य करत घरकुलांसाठी जागा दिली. आज त्याठिकाणी 622 घरकुले पूर्ण झाली आहेत. तर उर्वरीत 108 घरकुलांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. त्याचबरोबर अन्य झोपडपट्टी पुनर्वसनासाठीचा निधी परत गेला. शिवाय राज्य शासनाची झोपडपट्टी पुनर्वसनाची कोणतीच योजना नसल्याने हे काम थांबले गेले.

जयभिम झोपडपट्टीतील प्रलंबित 108 घरकुलांचे काम मार्गी लागण्याबाबत आज गुरुवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती देत प्रलंबित काम तातडीने पूर्णत्वास नेण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी केली. त्याचबरोबर सध्या महाराष्ट्र शासनाची झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात कोणत्याही प्रकारची योजना नसल्याने झोपडपट्टीमुक्त संकल्पना साकारण्यात अडचणी येत असल्याचे सांगत झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ववत सुरु करुन आहे झोपडपट्टीवासियांचे आहे त्याचठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे याकडे मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले.

दोन्ही प्रश्‍नांची सविस्तर माहिती घेऊन या संदर्भात लवकरच बैठक घेऊन हे प्रश्‍न मार्गी लावू, अशी ग्वाही नामदार आव्हाड यांनी दिली. यावेळी माजी नगरसेवक सुनिल पाटील हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा