You are currently viewing कणकवलीत १ मेला ‘रस्ता सुरक्षा मोटर सायकल फेरी’

कणकवलीत १ मेला ‘रस्ता सुरक्षा मोटर सायकल फेरी’

कणकवली

भारत देश स्वातंत्र्याचा “७५” अमृत महोत्सव साजरा करीत असताना ब्रह्माकुमारीज(माऊंट अबू-राजस्थान) व परिवहन विभाग तसेच कणकवली तालुका प्रवासी संघटना, आणि “आम्ही कणकवलीकर” यांच्या सहभागातून १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन यांचे औचित्य साधत “रस्ता-सुरक्षा मोटर सायकल फेरी”चे आयोजन जनजागृती साठी करण्यात आले आहे.

वाहन चालविताना रस्त्यावरील सुरक्षा कशी ठेवावी, सार्वजनिक ठिकाणी वाहने वापरताना काय दक्षता घ्यावी, वेग-नियंत्रण कां व कसे आवश्यक आहे, गतीपेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य कां दिले पाहिजे, हेल्मेटचा वापर अपघातात संरक्षण कसे देतो, अंमली पदार्थांचे सेवन कसे धोकादायक ठरू शकते, दुचाकीवरून प्रवास करताना भ्रमणध्वनीवर बोलणे कसे जीवघेणे ठरू शकते, रस्त्यावरील वाहतुकीच्या खुणा लक्षपूर्वक पाहूनच वाहने कां चालविली पाहिजेत, तसेच वाहन चालकानी रस्त्याचा वापर करताना स्वत: ची, अन्य वाहनचालकांची, वाहनांची, सजीव प्राण्यांची आणि राष्ट्रीय संपत्तीची काळजी कां घेणे जरूरीचे आहे, आणि मुख्य म्हणजे वाहन चालविताना मनाची एकाग्रता व शांतता ठेवणे कसे उपयुक्त ठरते; हे सर्वच वयोगटातील दुचाकी चालकाना ज्ञात करून देणे हा या फेरीचा उद्देश आहे.

या “रस्ता-सुरक्षा मोटर सायकल फेरी” मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वाहन चालकानी आपली नांवे दिनांक २९ रोजी दुपारी १२•०० वा. पर्यंत अशोक करंबेळकर, न्यूजपेपर एजन्सी, बाजारपेठ, कणकवली_ यांचेकडे नोंदविणे आवश्यक आहे. फेरीतील सहभागींची संख्या मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम पसंती देण्यात येईल. प्रत्येक सहभागीने आपले वाहन आणावयाचे असून सोबत वाहन चालविण्याचा परवाना-लायसन्स, वाहनाची कागदपत्रे, स्वत: चे हेल्मेट या गोष्टी आणणे बंधनकारक आहे. प्रत्येक सहभागीला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच फेरीचा गणवेश दिला जाईल.

फेरीचा मार्ग जानवली ग्रामपंचायत कार्यालय – अप्पासाहेब पटवर्धन चौक – बाजारपेठ मार्गे पटकीदेवी – रेल्वे स्टेशन – श्रीधर नाईक चौक – अप्पासाहेब पटवर्धन चौक असा राहील. फेरी दिनांक १ मे २०२२ सकाळी ठीक ०९•०० वाजता सुरू होईल; त्यापूर्वी १० मिनिटे सहभागीनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. या प्रसंगी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग, प्रांताधिकारी कणकवली, तहसीलदार कणकवली, पोलीस निरीक्षक कणकवली, नगराध्यक्ष कणकवली, सरपंच जानवली, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा