नेटावटे परिवाराचा अनोखा उपक्रम
नाशिक प्रतिनिधी
कालकथित मातोश्री वेणूबाई हरी नेटावटे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त नेटावटे परिवाराच्या वतीने ‘भारतीय संविधान परिचय’ व प्रबोधनात्मक कवी संमेलन’ असा सामाजिक उपक्रम घेऊन आईला अनोखी आदरांजली वाहिली आहे.
यावेळी भारतीय संविधान परिचय या विषयावर किरण मोहिते यांनी मार्गदर्शन केले. तर कवी, साहित्यिक नवनाथ रणखांबे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले असून कवी नवनाथ रणखांबे, कवी जगदेव भटू, कवी अॅड. प्रज्ञेश सोनावणे, कवी मिलिंद जाधव, कु. पल्लवी गुजरे यांनी ‘आई’ या विषयावर आणि सामाजिक कविता सादर करीत उपस्थितांचे प्रबोधन केले.
कालकथित वेणूबाई नेटावटे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने नेटावटे परिवाराच्या वतीने अनोखा उपक्रम घेतला असून, जातेगावचे सुपुत्र नाना नेटावटे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी समाजा पुढे एक चांगल्या उपक्रमांचा आदर्श घालून दिला आहे. असे प्रतिपादन कवी संमेलनाचे अध्यक्ष
नवनाथ रणखांबे यांनी केले.
आईचं दुःख सावरून नेटावटे परिवाराने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे व प्रबोधन केले आहे. म्हणून इतर परिवाराने देखील नेटावटे परिवाराचा आदर्श घ्यावा, असे तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी बोलतांना सांगितले.
नेटावटे परिवाराच्या वतीने जातेगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रबोधनात्मक आणि महामानवांच्या पुस्तकाचे वितरण करण्यात आले. आईचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३८ नागरिकांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन माता रमाई प्रतिष्ठानचे
अध्यक्ष नाना हरी नेटावटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर या अनोख्या उपक्रमाचे नेटावटे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.