जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम कथा
लाॅकडाऊन नंतरचा आज शाळेचा पहिलाच दिवस होता. जवळ जवळ दीड वर्षानंतर शाळा पुन्हा सुरू झाली होती. यंदा आठवीत नव्या वर्गात पण जुन्याच मित्रांबरोबर मजा, मस्ती, खेळ सगळं पुन्हा अनुभवायला मिळणार होते. या कल्पनेनेच प्रणव अधीर झाला होता. पटापट आवरून तो शाळेकडे धावतच सुटला.
प्रणव तसा जात्याच हुशार! दैवी देणगी वा चमत्कार किंवा आई वडिलांची पुण्याई म्हणून तो विलक्षण बुद्धिमत्ता घेऊनच जन्मला होता. ऐपत नसतानाही आई वडिलांनी त्याला चांगल्या शाळेत घातले होते.आणि आज तो सरस्वती विद्यालयातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि संचालक मंडळातील सर्व सदस्यांच्याही आवडीचा आणि चर्चेचा विषय झाला होता. बौद्धिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच स्पर्धांमध्ये तो विशेष प्रावीण्य मिळवत असे.
शिकवताना प्रश्न विचारून कधी कधी शिक्षकांनाही कोड्यात टाकणारी त्याची विचक्षणता अचंबित करणारी होती.
वर्गातील सर्व मुले ‘आपला मित्र हुशार आहे’ असा अभिमान बाळगून त्याच्याशी खेळीमेळीनंच वागत असत. बाईंनी जर कधी दुसर्या मुलाला प्रश्न विचारला तर तो आशेने प्रणवकडे बघे आणि प्रणव सुद्धा खुणेने किंवा कोणत्यातरी खुबीने त्याला उत्तर सांगत असे. त्यामुळे सर्वच मुलं त्याच्यावर खूश होती.
प्रणवमुळे शिक्षकांचं काम कमी झालं होतं. अभ्यासात कमी गती असलेल्या मुलांना प्रणववर सोपवून ते निर्धास्त असायचे. प्रणव देखील अगदी मनापासून सर्वांना न समजलेला अभ्यास समजावून देई. त्यामुळे वर्गातल्या सगळ्या मुलांच्या गळ्यातला तो ताईतच झाला होता जणू!
घरात, बाहेर, शाळेत सगळीकडे त्याच्या हुशारीची चर्चा आणि कौतुकाचा वर्षाव. त्यामुळे प्रणवला ‘ग’ ची बाधा झाली होती. त्याच्यासारख्या बुद्धिमान मुलाला हे देखील शोभतेच! असेच सर्व शिक्षकांचे आणि इतरांचेही म्हणणे होते.
पौगंडावस्थेत संप्रेरकातील बदल आणि त्याच्या जोडीला लाॅकडाऊनमुळे घडलेले मानसिक बदल या सर्वांमुळे हल्ली प्रणवच्या वागण्यात चिडचिडेपणा वाढला होता. शरीरातील बदलांमुळे तो सुदृढ आणि धष्टपुष्टही झाला होता. तो सर्वांना दुरूत्तरं करू लागला होता.दिवसेंदिवस त्याचा आक्रमकपणा वाढतच चालला होता. कधी कधी बोलताना त्याला भान राहत नसे.
लाॅकडाऊननंतर शाळेचे स्वरूप बदललेले होते. नवीन अभ्यासक्रम, मार्गदर्शक तत्त्व आणि नियमांचे पालन करीत शैक्षणिक कार्यक्रम आखण्याचे धोरण शाळेनेही अवलंबले होते. आॅनलाईन अभ्यासाला कंटाळून मुलं पुरती बेजार झाली होती. त्यामुळे शाळेनंही शारीरिक शिक्षण, खेळ, गप्पा, गाणी यांच्या जोडीला एक नवीन उपक्रम सुरू केला होता. दररोज बाहेरील कोणत्यातरी क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती मुलांची ‘संवादात्मक कार्यशाळा’ घेण्यासाठी बोलावण्याचे शाळेने ठरविले होते. त्याप्रमाणे आज पहिल्याच दिवशी ‘डाॅ. जोशी सर’ हे वैद्यकीय शाखेतील के. ई. एम. रूग्णालयात एम. बी. बी. एस. च्या विद्यार्थ्यांना शिकवणारे प्राध्यापक आज आठवीच्या वर्गावर एक तासिका घेण्यासाठी आले होते. संचालकांशी व्यक्तिशः परिचय असल्याने त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले होते. मुख्याध्यापकांनी त्यांची ओळख करून दिली आणि सर्व स्टाफ निवांत होऊन आॅफीसमध्ये निघून गेला. सरांनी वर्गाचं दार लावून घेतलं.
जोशी सर मेडिकल क्षेत्रातील एक नामवंत, प्रतिष्ठित असे प्राध्यापक. त्यांचे अनेक संशोधनपर ग्रंथ प्रसिद्ध होते. कृश अंगकाठीचे पण बुद्धिमत्तेचं तेज असणारे व्यक्तिमत्त्व.मेडिकलच्या विद्यार्थ्यांसमोर अनेक व्याख्याने गाजवलेले असले तरी शालेय विद्यार्थ्यांसमोर बोलण्याचा तसा हा अनुभव नवखा होता. शरीरविज्ञानाशी संबंधित संकल्पना ते सोप्या , सुटसुटीत आणि मुलांना समजेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत होते. प्रणव त्यांना प्रश्न विचारून शंका- निरसन करून घेत होता. सर देखील अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने उत्तरं देण्याचा प्रयत्न करत होते. इतर मुलांचं काही म्हणणं नसलं तरी प्रणवच्या शंकांचं काही समाधान होईना आणि यापेक्षा सोप्या पद्धतीने जोशी सरांना काही समजावता येईना. दोघेही बुद्धिमान पण आपापल्या पातळीवरचे! दोघांनाही बौद्धिकतेचा गर्व होताच. प्रणव प्रश्नाला उपप्रश्न विचारत होता. एरवी मेडिकलच्या विद्यार्थ्यांसमोर सहज उत्तरं देणारे सर आज मात्र प्रणवच्या प्रश्नांच्या सरबत्तीने थोडे भांबावूनच गेले होते.
बदललेल्या दुराग्रही आणि आक्रमक स्वभावामुळे प्रणवचाही तोल सुटल्यासारखा झाला. जिज्ञासापूर्तीची जागा आता अहंकाराने घेतली.प्रश्नोपप्रश्नांच्या वेळी त्याचा आवाज वाढू लागला. अतिशय संयतपणे समजावून सांगणारे जोशी सर देखील नकळतपणे रागात बोलल्यासारखे ठामपणाने मत मांडू लागले होते. प्रश्नोत्तरांच्या जागी विसंवाद झडू लागला.इतर मुलं मात्र पार गोंधळून गेली होती. ती कधी प्रणवकडे तर कधी जोशी सरांकडे पाहू लागली. नेमकं चाललंय तरी काय? मुलांना काहीच कळत नव्हतं. मुलं प्रणवला गेली आठ वर्ष ओळखत होती. जोशी सरांना मात्र ती आताच भेटली होती. मुलांचा हिरो मात्र प्रणव जाधवच. त्यामुळे दोघांमध्ये जरी टफ-फाईट होत असली तरी जिंकणार मात्र प्रणवच याची मुलांना खात्री होती.
इकडे दोघेही इरेला पेटले होते. दोघांचाही ‘इगो’ जागा झाला होता.त्यामुळे माघार कुणीच घेईना! प्रणवने सरांना निरूत्तर करायचे ठरवले होते. ‘मी सुद्धा हार मानणारा नाही’ अशा निश्चयाने सर सुद्धा सिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांच्याही नकळत त्या दोघांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आता निर्माण झाला होता. प्रणवचे हातवारे आणि तावातावाने बोलणे सुरूच होते. सरांचाही आवाज टिपेला पोहोचला होता. बंद खोलीतील घडणार्या या नाटकाची कल्पना बाहेर कोणालाही नव्हती, हे विशेष! या वादात ‘जो थांबला तो हरला’ असा प्रतिष्ठा पणाला लावणारा पेच निर्माण झाला. सरांचा अनुभव जिंकतो की काय असे वाटताक्षणी प्रणवचा ताबा सुटलाच! तो त्यांच्या अंगावर धावला. नुकत्याच तारूण्यात प्रवेश केलेल्या त्याच्या फुरफुरणार्या बाहूंनी जोशी सरांचा गळा धरला. सरांचा श्वास कोंडला. कृश शरीरयष्टीच्या सरांचं वय झालं होतं पण अनुभवसिद्ध अहंकार मात्र चिरतरूणच होता. आणि….. अचानक सरांचा आवाज बंद झाला. प्रणवने बुद्धी आणि शक्तीच्या जोरावर जोशी सरांना नामोहरम केले. आज एका उच्चस्तराला निम्न वर्गातील उच्चस्तरीयाने *परास्त* केले होते.
—हेमंत कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई