You are currently viewing बाल मनावर संस्कार.

बाल मनावर संस्कार.

 

आपली मुले चांगली निपजावीत असे सर्व आई-बापांना किंवा पालकांना अगदी मनापासून वाटत असते. परंतु या त्यांच्या वाटण्याला वाटाण्याच्याच अक्षता लागतात असे दिसून येते. याचे मुख्य कारण काय? याचा विचार कोणी करत नाही व त्याचा शोध घेण्याचाही कोणी प्रयत्न करीत नाही. सर्वसाधारण, सर्व लोकांचा असा गैरसमज आहे की, मुले जन्माला येताना आपले नशीब घेऊन येतात व त्यांच्या नशिबात जे काही ‘लिहिलेले आहे त्याप्रमाणे त्यांचे पुढील आयुष्य घडत जाणार. या अंधश्रद्धेच्या किंवा गैरसमजुतीच्या आहारी गेल्यामुळे माणसे दैवाधीन बनतात व मुलांना घडविण्यासाठी जे प्रयत्न करणे आवश्यक आहे ते करीत नाहीत.

वास्तविक, खरी वस्तुस्थिती वेगळीच असते. *मुलांवर आपण ज्या प्रकारचे संस्कार करू, त्या संस्कारांप्रमाणे त्या मुलांच्या जीवनाला आकार प्राप्त होत असतो. मुलांना पालकांकडून बरे-वाईट संस्कार कळत-नकळत प्राप्त होत असतात व त्या संस्कारांप्रमाणे त्या मुलांच्या जीवनाला इष्ट किंवा अनिष्ट वळण लागत असते. मुलांना इष्ट वळण लागण्यासाठी व भवितव्यांत ती देशाचे उत्कृष्ट नागरिक बनण्यासाठी त्यांच्यावर योजनापूर्वक सुसंस्कार केले जातील, अशी योग्य ती व्यवस्था होणे आवश्यक आहे.

वास्तविक हे सुसंस्कार मुलावर ते आईच्या गर्भात असल्यापासून होणे आवश्यक आहे. आठ वर्षापर्यंत मुलांवर जे संस्कार केले जातात ते संस्कार त्याच्यावर दृढ होऊन बसतात. या वयात मुलांवर आपण जे बरे-वाईट संस्कार करू, ते त्यांच्यावर वज्रलेप होऊन बसतात. याचे प्रमुख कारण असे की या वयात त्याचे बहिर्मन (Conscious Mind) Passive म्हणजे अल्प प्रमाणात कार्यरत असून ते प्रभावी नसते. याच्या उलट त्यांच्या वयात अंतर्मन (Sub-conscious Mind) अत्यंत प्रभावी असून त्याची ग्रहण करण्याची शक्ती तीव्र असते. म्हणून सर्व प्रकारचे सुसंस्कार व उत्तम सवयी मुलांना वयाच्या आठ वर्षापर्यंतच्या काळात होणे अगत्याचे आहे.*

प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट असलेली दिसून येते. मुळात पालकच अज्ञानी, अडाणी, अशिक्षित, अविचारी, अंधश्रद्धाधीन व व्यसनी असल्यामुळे मुलांवर बालपणापासून अनिष्ट संस्कार होत असतात व त्याचे दुष्परिणाम त्या बालकांना, त्यांच्या पालकांना व समाजाला भोगावे लागतात. जे पालक सुशिक्षित व निर्व्यसनी असतात, त्यांचा प्रकार जरा वेगळाच असतो. हा पालकवर्ग मुले आठ वर्षांची होईपर्यंत त्यांचे भरपूर लाड करतात, त्यांना कसल्याही उत्तम सवयी लावीत नाहीत व त्यांच्यावर योजनापूर्वक सुसंस्कार करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. याचे दुष्परिणाम असे होतात की पालक सुशिक्षित व निर्व्यसनी असून सुद्धा मुले बिघडतात व त्याचे अनिष्ट परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. *याचाच अर्थ असा की, ज्या वयात मुलांवर सुसंस्कार करायचे असतात, व त्यांना इष्ट सवयी लावायच्या असतात, त्या वयाच्या आठ वर्षांपर्यंतच्या काळात पालकवर्ग मुलांचे भरमसाट लाड करतात व ती मुले मोठी झाल्यावर मग जेव्हां त्यांना सुसंस्कार व इष्ट सवयी लावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती मुले बंडखोरी करतात व पालकांच्या प्रयत्नांना योग्य तो प्रतिसाद देत नाहीत.* अशा परिस्थितीत त्या मुलांच्या नशिबावर हवाला ठेवून राहण्यापलीकडे पालकांना दुसरा पर्याय उरत नाही.

*म्हणून अखिल जगात जर क्रांती घडवून आणायची असेल तर त्यासाठी मुलांवर त्यांच्या पहिल्या आठ वर्षांच्या काळांत उत्कृष्ट सुसंस्कार होतील व त्यांना इष्ट सवयी लागतील अशी योजना करणे आवश्यक आहे. ‘माणुसकी’ हाच एकमेव धर्म व ‘माणसांनी माणसांबरोबर माणसासारखे वागून एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे, हीच एकमेव देवाची उपासना, ‘या अधिष्ठानावर जर जगातील सर्व मुलांवर संस्कार केले गेले तर माणसातील ‘माणूस’ जागृत होऊन विश्वात खरी क्रांती घडून येईल.*

 

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा