You are currently viewing लोडशेडिंगच्या वादातून मारहाण झालेल्या “त्या” माजी सैनिकाला न्याय मिळवून द्या…

लोडशेडिंगच्या वादातून मारहाण झालेल्या “त्या” माजी सैनिकाला न्याय मिळवून द्या…

सिंधुदुर्ग सेवानिवृत्त सैनिक संघाची मागणी; सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना निवेदन…

सावंतवाडी

वीज वितरणच्या कोलगाव उपकेंद्रात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले माजी सैनिक चौरंग सावंत यांना मारहाण प्रकरणात योग्य न्याय मिळवून द्या, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. लोडशेडिंगच्या वादातून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्या नागरिकांना सोडवत असताना त्यांनी श्री. सावंत यांनासुद्धा मारहाण केली आहे. दरम्यान मारहाण झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नऊ जणांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून, आमच्या माजी सैनिकाला न्याय मिळवून द्यावा, असे त्यांनी यावेळी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना सांगितले. याबाबत त्यांनी श्री. कोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, २१ एप्रिलला मध्यरात्री लोडशेडिंगच्या वादातून काही नागरिकांनी कोळगाव उपकेंद्रात जात त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली. यावेळी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले माजी सैनिक श्री. सावंत नागरिकांना बाजूला करत असताना त्यांनासुद्धा जमावाने मारहाण केली. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर त्यातील दोघांना अटकही झाली आहे. दरम्यान एका माजी सैनिकाला झालेली मारहाण ही निषेधार्ह आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधितांवर योग्य ती कारवाई करून श्री. सावंत यांना न्याय मिळवून द्यावा, असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा