आम्ही सावंतवाडीकर संस्थेचा पुढाकार; नव्या पिढीला करुन घेणार सहभागी…
सावंतवाडी
ऐतिहासिक सावंतवाडी शहराची सर्वधर्मीय समभाव ही संस्कृती जोपासण्यासाठी आम्ही सावंतवाडीकर या संस्थेच्या माध्यमातून ईदच्या पार्श्वभूमीवर २५ एप्रिलला मनोमिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सर्वधर्मींयांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे, अशी माहीती संस्थेचे पदाधिकारी अॅड. संदिप निंबाळकर आणि डॉ.जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे दिली. येथिल श्रीराम वाचन मंदीर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, हा मेळावा २५ तारखेला सायंकाळी ६:३० वा. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या समोरील जागेत होणार आहे. तर या मेळाव्याच्या माध्यमातून या ठीकाणी सर्वधर्म समभाव येणार्या पिढीला माहीती व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. ईदच्या पार्श्वभूमिवर हा मेळावा यशस्वी झाल्यानंतर पुढील काळात येणारी दिवाळी, ख्रिसमस, संक्रात आदी सणांचे औचित्य साधून सुद्धा अशा प्रकारचे मेळावे घेण्यात येणार आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.