You are currently viewing एसटी बस कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार गुरुवार पर्यंत होणार – परिवहन मंत्री अनिल परब

एसटी बस कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार गुरुवार पर्यंत होणार – परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई : 

काही महिन्यांपासून रखडलेल्या एसटी महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत (8 ऑक्टोबर) जमा होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. नुकतंच ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. तर उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय घेऊ, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

मागील साडेपाच महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा सोडली तर एसटीचा पूर्णपणे प्रवास बंद होता. अगोदरच एसटी प्रचंड तोट्यात होती. त्यात हे कोरोनाचं संकट आलं. त्यामुळे एसटी आणखी तोट्यात गेली. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार कित्येक महिन्यांपासून रखडले होते.

या पार्श्वभूमीवर नुकतंच परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पगाराची थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी याबाबतची मागणी केली.

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल,’ असे ट्वीट अनिल परब यांनी स्पष्ट केले.

राज्यात पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरु

दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्यात पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसला परवानगी देताना सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही पूर्ण क्षमतेने एसटी चालवण्याचा निर्णय घेतला. हे करताना बसमध्ये मास्क लावणं बंधनकारक आहे. प्रत्येक फेरीला बसेसचं निर्जंतुकीकरण केलं जातं. प्रवाशांसाठी देखील बसेसमध्ये सॅनिटायझर ठेवण्यात आलं आहे. प्रत्येक प्रवाशाने हात सॅनिटाईझ केल्यावरच बसमध्ये प्रवेश करायचा आहे. सुरक्षेबाबत सर्व खबरदारी घेऊन आम्ही पूर्ण क्षमतेने बस सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा