You are currently viewing बादा नं .१ केंद्रशाळेत अभूतपूर्व शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन

बादा नं .१ केंद्रशाळेत अभूतपूर्व शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन

बांदा

‘एकच ध्यास- गुणवत्ता विकास’, ‘सहा वर्ष पूर्ण झालेले मूल शाळेत आलेच पाहिजे’ अशा प्रकारच्या विविध घोषणा देत शैक्षणिक वातावरणात पारंपारिक वेशभूषा व वाद्यासह बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढत जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ येथे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले. आज शाळेत शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बरोबर अंगणवाड्या देखील बंद होत्या. या कालावधीत अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी व पहिली दाखल होण्यापूर्वी त्यांची अभ्यासाची तयारी व्हावी त्यासाठी शाळा पूर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्याला बांदा सरपंच अक्रम खान, सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, राजेश विर्नोडकर, मकरंद तोरसकर, जावेद खतीब, किशोरी बांदेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर, सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल देसाई, रविंद्र सावंत पटेकर याबरोबर पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना कोल्हापुरी फेटे बांधून सजवलेल्या बैलगाडीत बसवून संपूर्ण बांदा शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक आकर्षण ठरले. यावेळी पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. या दिवशी शाळा परिसर पाना-फुलांनी, फुगे व रांगोळ्यांनी आकर्षक सजवला होता.


मेळाव्याच्या निमित्ताने विविध सात स्टाॅल मांडण्यात आले होते. या स्टॉलवर विद्यार्थ्यांची नोंदणी ,शारीरिक, बौद्धिक ,सामाजिक, भावनिक, भाषिक व गणित यासंबंधी तयारी तपासण्यात आली. तसेच पालकांना समुपदेशन करण्यात आले. यावेळी शाळेच्या परिसरात सेल्फी पाॅईंट तयार करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत भगीरथ प्रतिष्ठान पुरस्कृत मिळालेल्या दोन टीव्हीचे अनावरण करण्यात आले.
. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जे.डी. पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती ,सर्व शिक्षक ,अंगणवाडी सेविका व मदतनीस शाळेतील विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा