गुन्हे मागे घ्या; सर्व पक्षियांची मागणी
सावंतवाडी शहरातील काही भागात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून २१ एप्रिल रोजी ००.३० ते ३.०० या वेळेत अघोषित भारनियमन केले होते. नागरिकांच्या गाढ विश्रांतीच्या वेळेत कोणतीही पूर्वकल्पना न देता हे भारनियमन केल्याने उन्हाळ्याच्या असहनीय त्रासामुळे शहरातील नागरिक उपमुख्यकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे चौकशी साठी गेले असता, तेथील कर्मचाऱ्यांकडून त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने सर्व नागरिक कोलगाव येथील कार्यालयात गेले. परंतु, त्या ठिकाणी देखील त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने तेथे वादविवाद झाले.
अचानक विद्युत पुरवठा बंद झाल्याने हा सर्व प्रकार घडला असून, हे सर्व पूर्वनियोजित नव्हते तर तो नागरिकांचा उद्रेक होता. याचा विचार करून नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी सावंतवाडीतील सर्व पक्षीय नेत्यांनी, व्यापारी संघटना आणि सामाजिक मंडळांनी पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सावंतवाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, काँग्रेस शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर,माजी नगरसेवक आनंद नेवगी,माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, माजी नगरसेवक तानाजी वाडकर,माजी नगरसेविका भारती मोरे माजी नगरसेविका शुभांगी सुकी, माजी नगरसेविका माधुरी वाडकर, अतुल पेंढारकर सत्यवान बांदेकर देव्या सूर्याजी, दिलीप भालेकर बाबल्या दुभाषी, अमित परब,आदी उपस्थित होते.