You are currently viewing विवाह समस्या..

विवाह समस्या..

 

*विवाह ही जीवनातील फार मोठी महत्त्वाची घटना असते. असे असून सुद्धा विवाह या प्रश्नाकडे ज्या गंभीर दृष्टीने पहायला पाहिजे त्या गांभिर्याने माणसे पहात नाहीत. मुलगी वयात आली की तिचे लग्न केव्हां उरकून टाकतो अशी लग्नघाई मुलीच्या माता-पित्यांना झालेली असते. प्रत्येक व्यक्ती नशीब घेऊन आलेली असते व त्या नशिबाप्रमाणे पुढील सर्व घटना घडत जाणार अशी अंधश्रद्धा सर्व धर्मातील सर्व लोकांत असते. या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन माणसे आपल्या मुलींची लग्ने कशितरी उरकून टाकतात व मग पस्तावतात. बाजारात गेल्यावर कांदे बटाटे घेताना सुद्धा आपण विचार करतो व चांगल्या कांदे बटाट्यांची निवड करतो. परंतु अंधश्रद्धेचे बटाटे डोक्यात भरलेली माणसे लग्न या समस्येकडे तेवढ्या सुद्धां गांभिर्याने पहात नाहीत, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. हे झाले नियोजित विवाहाबद्दल. प्रेमविवाहाच्या बाबतीत सुद्धा तीच रड आहे. प्रेमविवाह करण्यात एक फार मोठे Thrill आहे अशा कल्पनेच्या आहारी जाऊन मुले आणि मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात’. प्रेम या शब्दाचा अर्थ सुद्धा या अक्कलशून्य मुलां-मुलींना माहीत नसतो. वास्तविक, प्रेम हा एक अलौकिक प्रकार आहे. ज्या प्रमाणे चिंतामणी, कल्पतरु व कामधेनू या दुर्मिळ वस्तू आहेत, त्या प्रमाणे प्रेम ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. खऱ्या प्रेमात अपेक्षा नसून त्याग अंतर्भूत असतो. खऱ्या प्रेमात एकमेकांसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी असते. असे हे अलौकिक प्रेम दुर्मिळ असते. परंतु या सत्याची जाणीव नसलेली मुले-मुली प्रेम या गोष्टीचा विपर्यास करतात व प्रेमाच्या नावाखाली लैंगिक आकर्षणाला बळी पडतात. असे जमलेले किंवा जमवलेले प्रेमविवाह निखालस अयशस्वी ठरतात, असा सर्वत्र अनुभव आहे. थोडक्यात, नियोजित विवाह असोत किंवा प्रेम विवाह असोत ते सर्व अपवादात्मक उदाहरणे वगळता यशस्वी होत नाहीत, असे दिसून येते. इथे असा प्रश्न निर्माण होईल की, विवाह यशस्वी होण्यासाठी काही उपाय आहेत का? जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून यावर उपाय आहेत. नियोजित विवाह किंवा प्रेम विवाह जमविताना सर्वसाधारणपणे सौंदर्य, पैसा, संपत्ती, समाजातील प्रतिष्ठा या गोष्टींवर विशेष भर दिला जातो. चूक होते ती नेमकी येथेच व पुढे या चुकीचा खिळा होऊन अवघे वैवाहिक जीवन खिळखिळे होऊन जाते. म्हणून विवाह जमविताना शिक्षण, स्वभाव आणि वधुवरांच्या आवडी-निवडी यावर अधिक भर दिला गेला पाहिजे. या तिन्ही निष्कर्षामध्ये दोघांची आवड-नावड याला विशेष प्राधान्य दिले गेले पाहिजे. वधुवरांच्या आवडी-निवडी जमल्या तर त्यांचे विवाह यशस्वी होण्याची ९९% दाट शक्यता असते. उदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करता येईल. मुलीला जर सिनेमा-नाटकाची आवड असेल व मुलाला किर्तन-प्रवचनाची आवड असेल तर असे विवाह यशस्वी होणे अशक्य आहे. थोडक्यात, विवाह जमविताना वधुवरांनी एकमेकांना न फसविता प्रामाणिकपणे आपल्या आवडी-निवडी स्पष्ट केल्या तर मुलां-मुलींना एकमेकांची निवड करणे शक्य होऊन ते विवाह यशस्वी होतील.*

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 14 =