केंद्रशासनाने स्टार प्रोजेक्ट अंतर्गत निवडलेल्या शाळा मध्ये खारेपाटण केंद्रशाळेचा समावेश
कणकवली
केंद्र शासनाने मंजूर केलेल्या राज्यातील ३६४ मॉडेल स्कुलपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कणकवली तालुक्यात समावेश असलेल्या खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ ला नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईच्या वतीने अत्याधुनिक अशी “रोबोटीक लॅब” मंजूर झाली असल्याची माहिती खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी दिली.
रोबोटीक लॅबच्या माध्यमातून खारेपाटण केंद्र शाळा नं.१ च्या शिरपेचात आणखी एक मानाच्या तुऱ्याची भर पडल्यामुळे खारेपाटण केंद्र शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर, माजी अध्यक्षा गौरी शिंदे, उपाध्यक्ष मंगेश तेली, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष आरती शीतल कावळे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा कीर्ती संकेत शेट्ये यांनी खारेपाटण केंद्र शाळेला मंजूर झालेल्या रोबोटीक लॅब बद्दल शाळेचे तसेच शाळेच्या सर्व शिक्षकांचे व विदयार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
केंद्र शासनाच्या स्टार प्रोजेक्ट अंतर्गत खारेपाटण केंद्र शाळा नं.१ ची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उच्च प्राथमिक मॉडेल स्कुल म्हणून निवड झाली असून खारेपाटण केंद्र शाळेला मंजूर झालेल्या रोबोटीक लॅबचे साहित्य व उपकरणे लवकरच या शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचेकडे सोपविण्यात येणार आहे. याबाबतचे लेखी पत्र राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक (प्रशासन ) समग्र शिक्षा मुंबईचे प्रमुख इम्तियाज काझी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना १८ एप्रिल २०२२ ला दिले आहे. खारेपाटण केंद्र शाळा नं.१ ला रोबोटीक लॅब मंजूर झाल्याबद्दल शाळेचे सर्व स्तरातील मान्यवराकडून तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे.