वैभववाडी
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक व थोर स्वातंत्र्य सेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या शासनमान्य व समाजमान्य संस्थेची मालवण आणि वेंगुर्ले तालुका शाखा स्थापन करण्यासाठी विशेष बैठक शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी मालवण व सायंकाळी वेंगुर्ले येथे आयोजित केली आहे. सदर दिवशी सकाळी ठिक १०.३० वा. श्री. शिवाजी वाचन मंदिर भरड, दत्त मंदिरजवळ मालवण येथे तर सायंकाळी ठिक ४.०० वा.डॉ.संजीव लिंगवत क्लिनिक,रहाठाच्या मारुती मंदिरजवळ,आशीर्वाद अपार्टमेंट मेन रोड, वेंगुर्ले येथे बैठक आयोजित केली आहे.
संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला ग्राहक हा ख-या अर्थाने ‘राजा’ होण्यासाठी ग्राहकांचे संघटन महत्त्वाचे आहे. यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये ग्राहकांचे संघटन, ग्राहकांचे प्रबोधन व ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे पवित्र कार्य सुरू आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कार्यरत असून वैभववाडी, कणकवली, देवगड, कुडाळ व सावंतवाडी येथे तालुका शाखा कार्यरत असून दोडामार्ग येथे तालुका शाखा पुनर्स्थापित करण्यात येणार आहे. तसेच मालवण आणि वेंगुर्ले येथे तालुका शाखा स्थापन करण्याबाबत शुक्रवार दिनांक २२ एप्रिल,२०२२ रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. ग्राहकांचे अज्ञान, असंघटितपणा आणि
ग्राहकाचे हक्क,अधिकार आणि कर्तव्याकडे दुर्लक्ष यामुळे ग्राहकाची फसवणूक,अडवणूक होत आहे.
ग्राहक राजा जागृत होऊन लोकशाही विकासाचा धागा होण्यासाठी मालवण आणि वेंगुर्ले तालुका शाखा स्थापन करण्यासंदर्भात दोन्ही तालुक्याच्या विविध भागातील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील. उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसकर यांनी केले आहे. मालवण तालुक्यातील व्यक्तीनी अधिक माहितीसाठी श्री.रत्नाकर कोळंबकर (9422392588) तर वेंगुर्ले तालुक्यातील व्यक्तीनी डॉ.संजीव लिैगवत (9421268268) यांच्याशी संपर्क साधावा असे संस्थेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.