नगरपरिषदेच्या पुरेशा देखभालीचा अभाव ; संभाव्य अपघाताचा वाढला धोका
इचलकरंजी / प्रतिनिधी :
इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाच्या पुरेशा देखभालीअभावी शहरातील बहुतांश ठिकाणचे ओपन जिम व लहान मुलांच्या खेळाच्या साहित्याची मोडतोड होवून मोठी दुरवस्था होत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष देवून संभाव्य अपघाताचा धोका टाळावा ,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाने शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे. यासाठी बहुतांश ठिकाणी ओपन जिम सुरु केले आहे. याशिवाय लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळाचे साहित्य बसवण्यात आले आहे. परंतू, बहुतांश ठिकाणी या ओपन जिमच्या साहित्याबरोबर खेळाच्या साहित्याची मोडतोड होवून मोठी दुरवस्था झाली असल्याचे दिसत आहे. यामागे इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाकडून ओपन जिम व खेळाच्या साहित्याची पुरेशी देखभाल होत नाही, हेच ठोस कारण असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. गंभीर प्रकारामुळे लाखो रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या ओपन जिम व लहान मुलांच्या खेळाच्या साहित्याची मोडतोड झाल्याने यातून संभाव्य अपघाताचा धोका व्यक्त केला जात आहे. याबाबत वारंवार नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे तक्रार करुन देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात आहे. त्यामुळे ओपन जिम व खेळाच्या साहित्याची समस्या आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष देवून मोडतोड झालेल्या ओपन जिम व खेळाच्या साहित्याची दुरुस्ती करुन संभाव्य अपघाताचा धोका टाळावा,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.