जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रा.सौ. सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना
काळ्या आईची कृपा, हो बघा उन्हात तापते
ऊन घेते अंगावर कशी उन्हात रापते…
काळीभोर ती सुंदर नाही ठरत नजर
पानकाळा लागताच हिरवा भर्जरी पदर …
सृजनाचे वेड तिला बीजबियाणे रूजते
इवलाले येता कोंभ पांघरूण ती घालते
ऊन वारा माती पाणी मुळे रूजतात खोल
वारावादळ झेलती आणि सांभाळती तोल…
डगमगती ना रोपे वाऱ्याशी ते खेळतात
माती हलू देत नाही मुळे घट्ट रूजतात
टाळ्या वाजविती रोपे रामा रामा रे श्रीरंगा
हासतात नाचतात रोपे करतात दंगा..
सारी मातीची किमया अंगोपांगी भरतात
श्रावणात बांधोबांध मोतीदाणे डुलतात
नाही ठरत नजर राघू घालती घिरट्या
झेपावती आभाळात शेतावरती रेघोट्या…
माती आहे माय मोठी उपजाऊ उपकारी
सारे येते मातीतून सकस ते घरीदारी
फुले फळे धनधान्य असो हरएक चीज
सरते शेवटी जोजवी येता माणसास नीज..
सारे काही घेते पोटी बिनतक्रार सोसते
टाका काहीही मातीत सारे एकरूप होते
तिच्यातूनच सृजन तिच्यातच आहे लय
अशी सोशिक सोशिक जशी आपली हो माय …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ३० मार्च २०२२
वेळ : दुपारी ४ : १०