माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले आणि मनसे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांच्या जवळचे समजले जाणारे द्रष्टे नेतृत्व म्हणजे मा.आमदार परशुराम उपरकर. मा.बाळासाहेबांनी हाती दिलेला भगवा कधी खाली न ठेवता एक कडवट शिवसैनिक म्हणून रस्त्यावर उतरून ज्याने संघर्ष केला, आंदोलने यशस्वी केली, प्रसंगी पोलिसांचा मार देखील खाल्ला असे कडवट शिवसैनिक होते ते परशुराम उपरकर उर्फ जीजी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी मा.आमदार परशुराम उपरकर यांचे नाव कायम घेतले जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना विस्तारण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत पक्षासाठी केलेला त्याग, प्रसंगी रक्त ही सांडलेले नेतृत्व म्हणजे परशुराम उपरकर. नारायण राणे ज्यावेळेस पक्षांतर करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक लोकप्रतिनिधी काँग्रेसवासी झाले. परंतु बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून परशुराम उपरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा नेहमीच फडकवत ठेवला. रात्री अपरात्री त्यांच्या पाठीमागून गावगुंड देखील फिरायचे परंतु तशाही परिस्थितीत शिवसेना पक्षाचे अस्तित्व सिंधुदुर्ग जिल्ह्यात टिकवून ठेवले. शिवसेना नावाला सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिल्लक ठेवणार नाही असे जिथे म्हटले जायचे त्या ठिकाणी परशुराम उपरकर यांनी शिवसेनेला फक्त शिल्लक ठेवले नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रुजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. त्यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात जाऊन शिवसेना निवडलेला पर्याय म्हणजे एक धाडस होते आणि हे धाडस दाखवले होते ते केवळ माजी आमदार परशुराम उपरकर यांनी. त्यांच्या या धाडसाचे फलित म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना दिलेली विधानपरिषदेची आमदारकी होय. अतिशय खडतर काळात जीजी उर्फ परशुराम उपरकर यांनी शिवसैनिकांना धीर दिला नेतृत्व दिले, जिथे कुठे शिवसैनिकांना अटकाव झाला, अडचणी निर्माण केल्या गेल्या, त्या ठिकाणी कितीही मोठा जमाव असला तरीही त्या जमावाला भीडण्याचे धारिष्ट्य केवळ परशुराम उपरकर हे दाखवत होते त्यामुळे जीजींचे विरोधक देखील त्यांची एंट्री होताच थरकाप कापायचे.
जिजींनी शिवसेनेसाठी आपले सर्वस्व त्यागून जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवली होती. शिवसेनेकडून विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरी त्यावेळी शिवसेनेचा उमेदवार म्हणून उभे राहणेही कठीण होते, त्या ठिकाणी जीजी धैर्याने उभे राहिले आणि राणे यांच्या विरोधात जनतेच्या मनामध्ये त्यांनी एक संतापाची सुप्त लाट निर्माण केली. पुढे हाच संतापाचा दुवा शिवसेनेत प्रवेश केलेल्या दीपक केसरकर यांनी पकडत राणे यांच्या विरोधात रान उठवले आणि शिवसेना-भाजप युतीची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाली. परंतु या सत्तेचा उपभोग घेण्यासाठी ज्यांनी शिवसेना जिवंत ठेवली ते जीजी उपरकर मात्र शिवसेनेत नव्हते. त्यांनी शिवसेनेतील कणखर नेतृत्व असणारे राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून शिवसेनेला रामराम ठोकला होता. त्यानंतरच्या काळात जीजी उपरकर यांनी मनसेचे नेतृत्व स्वीकारून मनसेला जिल्ह्यात खंबीरपणे उभे राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यांना राजकारणाबरोबरच प्रशासनाची उत्कृष्ट जाण होती. प्रशासन कोळून प्यायलेल्या जीजींनी आपल्या कार्यशैलीने आणि अभ्यासूवृत्तीने जिल्हा प्रशासनात आपला दरारा निर्माण केला होता. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक नवनवीन शिवसैनिक तयार झालेत परंतु जीजीसारखा भगव्याशी एकनिष्ठ राहिलेला कडवट शिवसैनिक जिल्ह्यात दिसेनासा झाला आहे. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आजही परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचे नाव आदराने घेताना दिसतो. शिवसेना सोडून मनसेत दाखल झालेल्या जीजी उपरकर यांची दिशा चुकली की बरोबर यापेक्षा आपल्या लढवय्या नेतृत्वाने जिल्ह्यात सर्व मुखी आपले नाव कायमच कोरून ठेवले. अशा या कणखर उमद्या नेतृत्वाचा आज जन्मदिवस. संवाद मीडियाकडून माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आणि भावी वाटचालीस सदिच्छा.