मराठी एकीकरण समितीची मागणी : अधिका-यांना निवेदन सादर
कोल्हापूर येथे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात हिंदी भाषेतील फलक काढून तो मराठी भाषेत लावावा, या मागणीचे निवेदन मराठी एकीकरण समितीच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
राज्य सरकारने शासकीय व निमशासकीय कार्यालयात मराठी भाषेचा फलक लावण्याबरोबरच मराठी भाषेतूनच सर्व कामकाज करण्याचे परिपञक काढले आहे, असे असताना कोल्हापूर येथे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात हिंदी भाषेतून फलक लावण्यात आला आहे.
याशिवाय हिंदी भाषेतून व्यवहार केल्यास आपले कामकाज जलदगतीने होईल, असे नमूद करुन राज्य सरकारच्या परिपञकाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. यातून मराठी भाषेचा अवमान होत असल्याचे दिसत असून या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेवून सदर कार्यालयातील हिंदी भाषेतील फलक काढून त्याठिकाणी मराठी भाषेतील फलक लावावा आणि सर्व शासकीय कामकाज हे मराठी भाषेतूनच करावे.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठी एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापूर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करु, असे आश्वासन दिले. यावेळी मराठी एकीकरण समितीचे अमित कुंभार, अक्षय पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते.