You are currently viewing बालकविता

बालकविता

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री आदिती मसुरकर यांची बाल काव्यरचना

हिरव्या हिरव्या रानामध्ये
हिरवे हिरवे झाड
झाडावर उड्या मारती
तीन माकडे द्वाड

खळखळणारे झरे
दिसतात न्यारे
मंदधुंद गीत गात
सुटले थंडगार वारे

झाडावर डुलतात
रगीत फुले छान
टाळ्या वाजवून स्वागत
करते हिरवेगार पान

कुहूकुहू गोड गीत
कोकीळ गातो
मोर बघा रानामध्ये
थुईथुई नाचतो

विठू विठू पोपटा तुझी
चोच कशी लाल
पानाचा विडा तू
खाल्लास का रे काल

टुणटुण उड्या मारत ससा
कोवळे गवत खातो
पान जरी पडले तरी
बिळात जाऊन लपतो

*✍️© सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा