You are currently viewing अप्रतिम गझल..

अप्रतिम गझल..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सदस्य गजलेतील शिवाजी म्हणून ओळखले जाणारे अहमदनगर येथील डॉ.शिवाजी कोळी यांची अप्रतिम गझल*

 

छुपी लढाई लढताना तो अगतिक झाला आहे

प्रत्येकाचा मेंदू हतबल सैनिक झाला आहे

 

प्रारब्धाची हूल देउनी प्राण पळवले त्यांनी

काळ कोडगा आणि विधाता दांभिक झाला आहे

 

उभ्या जगाचे एकसारखे भाग्य रेखले कोणी ?

(भविष्य बघणाऱ्याचा मुखडा त्रासिक झाला आहे)

 

सुपातल्यांची बघून तगमग हात जोडले त्याने

जात्यामधला अखेरचा क्षण आस्तिक झाला आहे

 

कवचकुंडले तपासण्याची ज्याला त्याला घाई !

नव्या युगाचा मृत्यू आता ऐच्छिक झाला आहे

 

जागा खाली करण्याचे जर कारण कळले नाही

प्रश्न विचारत नाही आत्मा सोशिक झाला आहे

 

तलवारीची धार कशाने बोथट झाली आहे

वार कदाचित पात्यावरती शाब्दिक झाला आहे

 

संथपणाच्या क्षितिजावरचा प्रपात दिसला नाही

म्हणून माझ्या नावेचा तो नाविक झाला आहे

 

कुणी मालकी सांगितली तर हसून उत्तर देतो

आता भोळा शिवा मनाने वैश्विक झाला आहे

 

डॉ. शिवाजी काळे

प्रतिक्रिया व्यक्त करा