You are currently viewing ट्रकसह अल्‍टोकार फोंडाघाटात कोसळली…

ट्रकसह अल्‍टोकार फोंडाघाटात कोसळली…

सुदैवाने जीवितन हानी टळली; तिघे जखमी, शंभर फुटावर अडकली दोन्ही वाहने…

कणकवली

तालुक्‍यातील फोंडाघाटात आज ट्रक आणि अल्‍टोकार दरीत कोसळले. सुमारे शंभर खोल अंतरावर एका झाडाला आदळून ही वाहने थांबली. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सुदैवाने वाहनातील चालक आणि प्रवाशांना फारशी दुखापत झाली नाही. अपघात नेमका कसा झाला याबाबतचे कारण अद्याप स्पष्‍ट झालेले नाही. दाजीपूर खिंडीपासून फोंडयाच्या दिशेने सुमारे ३ किमी अंतरावर दुपारी ११.४५ च्या सुमारास हा अपघात घडला.
रंजित बाळासो भांडवले (वय ३१, रा. भडगाव, ता कागल, जि कोल्हापूर ) हे अल्टो कार क्र. ( MH 06 AN 7787 ) मधून प्रवास करत होते. तर ट्रकचालक मोहम्मद बापूसो मुजावर ( वय ५५, रा.कागल, जि.कोल्हापूर ) हे आपल्या ताब्यातील ट्रक क्र. ( MH 41 G 5355 ) चालवत होते. फोंडाघाटात दोन्ही वाहने १०० फूट खोल दरीत कोसळली. यात अल्टो कार ही ट्रकखाली चिरडल्याचे दिसत अाहे. या अपघातात अल्टो चालक रंजित भांडवले यांनी सीटबेल्ट लावलेला असल्यामुळे ते बचावले. भांडवले हे किरकोळ जखमी आहेत. तर ट्रकचालक मोहम्मद मुजावर आणि ट्रकमधील सहप्रवासी सुभाष शिवाजी देसाई, दत्तात्रय बाबुराव देसाई ( दोघे रा. मसवे, भुदरगड जि कोल्हापूर ) हे जखमी झाले आहेत.
अपघाताचे वृत्त समजल्‍यानंतर घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी जात दरीत उतरून सर्व अपघातग्रस्त जखमींना सुखरूप दरीतून बाहेर काढले. घटनास्थळी कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, सागर मचाळ, हायवे वाहतूक पोलीस हवालदार दिलीप पाटील, हवालदार अण्णा घारकर दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा