You are currently viewing वसंताचे गीत व्हावे

वसंताचे गीत व्हावे

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच….लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक,कवी दीपक पटेकर यांची अष्टाक्षरी काव्यरचना

नववधू सजे जशी
सुष्टी नटली सजली
पाने फुले डवरली
बहरली झाडे वेली

आला चाफ्याला बहर
लालेलाल झाले झाड
उष्ण उन्हाचा कहर
डोले डौलात तो माड

आग ओकतो रस्त्यात
लाल हा गुलमोहर
स्वतः जळुनी उन्हात
नाचवितो मनी मोर

लालबुंद बहरुनी
सडा सांडतो पळस
अंगणात वृंदावनी
गोड हसते तुळस

मोहरले आम्रतरू
फळ जन्मे लडीवाळे
फणसाच्या कडेवर
खेळतात मुले बाळे

निसर्गाच्या सोहळ्यात
आता न्हाऊनिया जावे
शाल हिरवी नेसुनी
वसंताचे गीत व्हावे

©(दीपि)
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 11 =