अँड.परिमल नाईक; आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी…
सावंतवाडी
मोती तलावाच्या संवर्धनासाठी सावंतवाडीच्या राजघराण्याने घेतलेली भूमिका अत्यंत स्वागतार्ह आहे. आता युवराजेंनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अडलेले घोडे सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन सावंतवाडी पालिकेचे माजी आरोग्य सभापती अॅड. परिमल नाईक यांनी केले आहे. दरम्यान राणी जानकीबाई सुतिकागृहाच्या माध्यमातून या आधीच राजघराण्याने मोठे योगदान दिले आहे. त्याच प्रमाणे आता सावंतवाडी शहरात वैद्यकीय दालन उभे राहण्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, शासनाने सुध्दा त्यांचे नुकसान होवू नये, यासाठी योग्य तो सुवर्णमध्य काढावा, असेही श्री. नाईक यांनी म्हटले आहे.
श्री. नाईक यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रक दिले. त्यात असे म्हटले आहे की, सावंतवाडी शहराला पर्यटन दृष्ट्या महत्वाचा ठरणार्या मोती तलावाच्या विकासासाठी राजघराण्याने सकारात्मक भूमिका घेतली हे ऐकुन खुप आनंद व समाधान वाटले. मी आरोग्य सभापती असताना याबाबतचा निर्णय घेतला होता व त्या दृष्टीने सकारात्मक पाऊले सुद्धा उचलली होती परंतु दुर्दैवाने कोरोना संकटाच्या आघाताने पुढील कारवाई वेळीच करता आली नाही याची खंत आहे परंतू आता खुद्द राजघराण्यानेच सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे न्यायालयीन वादासहित सर्व प्रश्न सोयीस्कर रित्या सुटू शकतील. ही भूमिका घेणार्या युवराज लखमराजेंचे मी व्यक्तिशः आभार मानतो. आता त्यांनी रखडलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न सुद्धा तातडीने मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करावा. आणि शासनाने ही त्यांची जमिन घेताना त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.