जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर यांचा अप्रतिम लेख
सूर्य मावळत असतो. आभाळात नारिंगी रंगांची कारंजी ऊसळतात. पिवळे जांभळे रंगही त्यात मिसळतात. पक्षी घरट्याकडे झेपावतात. शेतातून परतणार्या बैलांच्या घुंगुरमाळा घणघणतात. त्या घुंगुरमाळांचा प्रभात समयीचा नाद आणि या संध्यारंगातल्या नादात फरक का जाणवतो न कळे!
गुराखीही त्याचं गोधन घराकडे वळवत असतो. अवचित नदीकाठच्या मंदीरात कुणी घंटा वाजवतं. मशीदीतल्या नमाझाचे सूर कानी पडतात. चर्चमधल्या घंटा वाजतात. खरं म्हणजे या सर्व प्रार्थनाच. मनातले हे नाद संधीप्रकाशात नहालेल्या या कातरवेळेची साक्ष देतात!
ठिकठिकाणी कामं करणारा जनसमुदाय घराकडे परतत असतो. रेल्वेची फलाटं, बसचे थांबे माणसांनी फुललेले असतात. रस्त्यावर गती असते पण त्या गतीत सकाळचे चैतन्य नसते. एक प्रकारची मरगळ, थकवा, उदासीनता असते. ऊजेड आणि अंधाराच्या मधली ही संमीश्र कातरवेळ, मनाला प्रचंड कासावीस करणारी, हुरहुर लावणारी असते.
‘कातरवेळ’ म्हणजे निरोपाची वेळ. निरोप मावळणार्या दिनकराला, संपणार्या दिवसाला. निरोप कुठलाही असो, कुणालाही असो, त्याचं
दडपण काळजात दाटतंच. कदाचित्
हे दडपण, ही हुरहुर निसटणार्या क्षणांसाठी असेल. खूप काहीतरी चुकल्यासारखं वाटून, एक अपराधीपणही मनाला कुरतडत रहातं. कां कळत नाही पण प्रचंड ओढ जाणवते. त्या ओढीत भारलेपण असतं. आकाशातले हे सुंंदर संध्यारंग निरखताना मनातल्या प्रवाहांना मात्र बेचैन करतात. कोहम् किमकारणम् अशी प्रश्नचिन्हं उमटल्याशिवाय राहत नाहीत.
अंधाराच्या डोहात बुडण्यापूर्वी एक गोठलेपणच जाणवतं. आठवणी दाटतात. त्या संधीप्रकाशात आयुष्याचे हरवलेले रंग शोधावेसे वाटतात. हरवलेलं नातं, हरवलेलं प्रेम, हरवलेलं छत्र, हरवलेले शब्द, हरवलेले कितीतरी घनदाट क्षण भाव विव्हळ करतात. पायात अडखळणारी लांब सावलीही अविश्वसनीय वाटू लागते. कधी कधी तर मन रिकामी कूपीच असते. काहीच नसतं. विचार, भावना, राग, लोभ, गुंतणं, तुटणं काहीच नसतं. असतं ते फक्त रिकामपण… पोकळी. या कातरवेळी कधी रिमझिमणारा पाऊस मन ओलं करतो. पानांवरुन पाणी थेंबाथेंबाने टपकत असते. एखादा पक्षी पंख झाडून आक्रंदत असतो. मग या ओल्या कातरवेळी कवी ग्रेसच्या ओळी आठवतात.
मेघात अडकली किरणे,
हा सूर्य सोडवित होता.
खिडकीवर धुरकट तेव्हां,
कंदील एकटा होता.
स्तब्ध असते का सारेच या कातरवेळी?
कुणीच कुणाचे नसते. जो तो एकटाच असतो. गर्दीतलं हे एकटेपण हेच जणु सत्य असते! ही जाणीव देणारी कातरवेळ हळुहळु पुढे सरकते. रंगलेलं आकाश, काळोखात बुडत असताना, संपूर्ण नभपटलावर एखादीच चांदणी ऊगवते. “WISHING STAR “!
आणि ती डुबलेल्या मनाला उचलते. देव्हार्यात दिवेलागण होते. त्या दीपत्कारात ‘शुभंकरोती कल्याणम्’ चे सूर मनाला चटकन् ऊभारी देतात. कातरवेळी च्या पलीकडचा, ओलांडलेला हा क्षण नाभीतून ॐकार घुमवतो.
झाडांशी निजलो आपण!
झाडात पुन्हा उगवाया !!
भय इथले संपते का मग?
निरोपाच्या क्षणी अडखळलेलं मन, कातरवेळीच्या वादळातून हळुहळु बाहेरही येतं. तो क्षण असतो प्रतिक्षेचा.
नव्या दिवसाची
प्रतीक्षा !!…
मन सहजच गुणगुणतं…
“कही दूर जब, दिन ढल जाए,
साँझ की दुल्हन, बदन चुराए,
चुपकेसे आए !!
मेरे खयालोंके आँगनमे
कोई सपनोंके दीप जलाए,
दीप जलाए… !!
राधिका भांडारकर पुणे.