*गझलेच्या दुनियेतील शिवाजी अशी ओळख असणारे अहमदनगर येथील डॉक्टर शिवाजी काळे यांची अप्रतिम गझल रचना*
ठसे शोधले मी धुक्यावर तुझे
मला नाव दिसले उन्हावर तुझे
नको वासनांचे परागीभवन
निरागस मना पंख आवर तुझे
स्वतःच्या किनाऱ्यास ओलांडते
कसे प्रेम इतके अनावर तुझे
हिशोबात का व्याज धरतोस तू
कुठे कर्ज आहे कुणावर तुझे
खुणवतात वेळीअवेळी मला
विहरतात पक्षी घरावर तुझे
मला तर झळांचे व्यसन लागले
कसे भागते पावसावर तुझे
नदीला कसा दोष देतोस तू
कुठे लक्ष होते पुरावर तुझे
विनापाश गर्दीत हरवेन मी
परततो झरे आटल्यावर तुझे
जगाला नको कष्ट जाळायचे
शिवा बांध घर कापरावर तुझे
डॉ. शिवाजी काळे