धर्म जर एकच आहे तर या जगात अनेक धर्म निर्माण झाले ते कसे ? त्याचे मानवजातीवर काय परिणाम झाले ?
वास्तविक ” आपला धर्म श्रेष्ठ व इतरांचा धर्म कनिष्ठ ” असे म्हणण्याचा या लोकांना अधिकार काय ? अन्य धर्मांचा अभ्यास करण्याचे तर सोडाच पण स्वतःच्या धर्माचेही काहीच ज्ञान नसलेले लोकच अन्य धर्मांचा व अन्य धर्मीय लोकांचा द्वेष करतात, ही मोठी शोचनीय गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की, जरी जगातील सर्व लोकांनी विशिष्ट एकच पद्धत स्वीकारली म्हणजेच साध्या भाषेत सांगायचे म्हणजे जगातील सर्व लोकांनी एकच तथाकथित ( so called ) धर्म स्वीकारला तर या जगाचा, त्या धर्माचा व त्या धर्माच्या लोकांचा काय लाभ व कल्याण होणार आहे ? एकाच धर्माचे लोक काय आपापसात भांडत नाहीत ? एकमेकांच्या उरावर बसत नाहीत ? एकमेकांचे खूण करीत नाहीत ? लढाया व युद्ध करीत नाहीत ? दुसरा महत्वाचा मुद्दा असा की, तथाकथित एक धर्म सोडून तथाकथित दुसरा धर्म लालूच दाखवून किंवा जबरदस्तीने स्वीकारण्यास भाग पाडून ही तथाकथित धार्मिक मंडळी जगाचे व त्यांच्या धर्माचे काय हित साधतात ? धर्मासाठी किंवा धर्मांतरासाठी केलेला अमाप खर्च, रक्तपात व इतर धर्मांच्या लोकांचे संपादन केलेले वैर म्हणजे व्यर्थ खटाटोप असून ते फार मोठे पाप आहे, हे या धर्मांध लोकांना कळू नये हे नवल नव्हे काय ?
( क्रमशः..)
*– सद्गुरु श्री वामनराव पै.*