You are currently viewing रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांना विघ्नहर्ता नाट्यभूषण पुरस्कार

रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांना विघ्नहर्ता नाट्यभूषण पुरस्कार

उद्या  मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम

मुंबई

सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध रंगकर्मी, लेखक-दिग्दर्शक व आवाजतज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांना मुंबईतील प्रतिष्ठेच्या विघ्नहर्ता प्रतिष्ठानचा २०२२ चा “विघ्नहर्ता नाट्य भूषण पुरस्कार” घोषित करण्यात आला आहे. उद्या गुढीपाडव्यादिवशी २ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता दामोदर नाट्यगृह परेल येथे अनेक नामवंतांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मुंबईतील विघ्नहर्ता प्रतिष्ठान या गेली अनेक वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने नाटक, शिक्षण, चित्रपट, कविता, साहित्य, सामाजिक, पत्रकारिता, ग्रामविकास  क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना व्यक्तींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आजवर अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे
२०२२ च्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता मोरे यांनी केली असून या पुरस्कारांमध्ये नाट्य भूषण पुरस्कारासाठी श्रीनिवास नार्वेकर यांचा समावेश आहे. श्री नार्वेकर यांच्या सोबतच ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक शिंदे लेखक-दिग्दर्शक भालचंद्र कुबल, दिग्दर्शक आणि लेखक अरुण कदम, कवी संजय शिंदे आदी अनेक मान्यवरांचाही विविध पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नाटककार रमेश थोरात यांना प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मूळ सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथील असलेले श्रीनिवास नार्वेकर गेली सुमारे तीस वर्षे रंगभूमी चित्रपट या क्षेत्रात समर्थपणे कार्यरत आहेत. हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवरून सुरुवात केल्यानंतर आज ते व्यावसायिक क्षेत्रात उत्तम स्थिरावले आहेत. नाटक, चित्रपट, जाहिरात, भाषांतर या क्षेत्रात आज त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. सावंतवाडीमध्ये नाट्यविलास,  बालरंग या स्वतःच्या दोन संस्थांच्या तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सुमारे ३० वर्षे नाट्य व साहित्य चळवळ समर्थपणे चालवली. बालरंगच्या माध्यमातून शेकडो मुले विविध स्पर्धा कार्यक्रम आणि प्रकल्पाच्या माध्यमातून समोर आणली आहेत.

नार्वेकर यांच्या सांस्कृतिक व साहित्यिक कार्याबद्दल त्यांना अनेक महत्त्वाचे पुरस्कारही मिळाले आहेत. जयंत साळगावकर फाउंडेशनचा गणेश महानिधी पुरस्कार, ललित रंगभूमी पुणेचा यशवंत पुरस्कार, महाराष्ट्र रंगभूमीचा महाराष्ट्र युवा गौरव पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा युवा कार्यकर्ता पुरस्कार, सावंतवाडी नगरपरिषदेचा नाट्य गौरव पुरस्कार असे अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांना यापूर्वी मिळाले आहेत. हौशी व प्रायोगिक रंगभूमीवर काम करताना त्यांनी केलेल्या स्पर्धा प्रयोगांतून लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत या सर्वच क्षेत्रात विविध राज्यस्तरीय स्पर्धांमधून सुमारे हजारांहून अधिक पारितोषिके मिळविलेली आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पु. ल. देशपांडे लिखित “एक झुंज वाऱ्याशी” या नाटकाची दोन वर्षांपूर्वी संगीत नाटक अकादमी आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवांमध्ये निवड झाली.

नार्वेकर यांची अनेक पुस्तके यापूर्वी प्रकाशित झाली असून त्यांच्या कथासंग्रहाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कारही मिळालेला आहे. अनेक वर्तमानपत्रांमधील त्यांची प्रासंगिक सदरे अत्यंत गाजलेली आहेत. तसेच अनेक दिवाळी अंकांमधून त्यांच्या गूढकथा तसेच भारतीय व जागतिक चित्रपटांवरील अभ्यासपूर्ण लेखनही गाजले आहे. चित्रपट व नाटक यांच्या अभ्यासाव्यतिरिक्त आवाजसाधना हादेखील त्यांचा अभ्यासाचा विषय असून या सर्व विषयांवर महाराष्ट्रभरात त्यांची व्याख्याने व कार्यशाळा होत असतात.

प्रामुख्याने संस्थात्मक व चळवळ स्वरूपात काम करणे ही त्यांची मुख्य आवड असल्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी बरेच कार्य केलेले आहे. लोकांना साहित्य वाचनाची गोडी लागावी यासाठी त्यांनी मुंबईमध्ये “चला, वाचू या” ही महत्त्वाची अभिवाचन चळवळ सुरू केली. गेली ७ वर्षे दर महिन्याला सातत्याने सुरू असलेली ही मुंबईतीलच नव्हे तर कदाचित महाराष्ट्रातील एकमेव मासिक अभिवाचन चळवळ आहे. अनेक नामवंत कलाकार या उपक्रमात विनामानधन सहभागी होतात, हे या चळवळीचे यश आहे. या अभिवाचन चळवळीचे हे सातवे वर्ष असून लवकरच या उपक्रमाचे ७५ वे पुष्प सादर होणार आहे. “चला, वाचू या” उपक्रमाच्या सातत्याबद्दल त्यांना पुण्यातील नातू फाउंडेशनचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

कोरोना मुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रायोगिक नाट्यकर्मीना किफायतशीर दरामध्ये उत्तम व्यासपीठ निर्माण होण्यासाठी नार्वेकर यांनी नेहरूनगर कुर्ला परिसरात समाजसेवक भाऊ कोरगावकर यांच्या सहकार्याने पन्नास आसनी अद्ययावत ‘प्रबोधन प्रयोग घर’ या छोटेखानी नाट्यगृहाची उभारणी केली, ज्याचा मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अन्य रंगकर्मींना चांगलाच फायदा होत आहे. या अनोख्या प्रयत्नाची दखल ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाशिकच्या नाट्य संमेलनामध्येही आवर्जून घेतली.

कोंकणात बाल सांस्कृतिक चळवळ रुजवलेल्या नार्वेकर यांनी तब्बल २८ वर्षांनंतर त्यांच्या “बालरंग” या छोट्यांच्या मासिकाची भाऊ कोरगावकर यांच्या सहकार्याने पुन्हा सुरुवात केली असून नोव्हेंबर २०२१ मध्ये शुभारंभ अंकाचे प्रकाशन झाले. एप्रिल २०२२ पासून हा अंक त्रैमासिक स्वरूपात पुन्हा बाल वाचकांच्या भेटीला येत आहे.

नार्वेकर यांनी गोवा कला अकादमीच्या नाट्य विभागाचे सल्लागार म्हणून तसेच मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर नाट्यशास्त्र विभागासाठी अतिथि व्याख्याता म्हणूनही काम केले आहे. नुकतीच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने तिकीट बुकिंग वेबसाईटची सुरुवात केली आहे.

श्रीनिवास नार्वेकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मित्रपरिवारातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा