You are currently viewing थकित बीले येत्या जूलैपर्यत पुर्ण करणार

थकित बीले येत्या जूलैपर्यत पुर्ण करणार

माध्य.शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख

शिक्षक भारतीसोबतच्या सहविचारसभेत ठोस आश्वासन

तळेरे:-प्रतिनिधी

सर्व प्रकारची थकीत बीले येत्या जुलै २०२२पर्यंत पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी शिक्षक भारती सिंधुदुर्ग सोबत आयोजित केलेल्या सहविचार सभेत दिली.
शिक्षक भारती सिंधुदुर्ग व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची सहविचारसभा माध्य. शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात सिंधुदुर्गनगरी येथे नुकतीच संपन्न झाली.
माध्य.शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर,सचिव समीर परब राज्य प्रतिनिधी सी.डी. चव्हाण, संघटक आकाश पारकर ,महिला आघाडी प्रमुख सौ.सुस्मिता चव्हाण तसेच दीपक तारी, अनंत सावंत,जनार्दन शेळके, दत्तात्रय मारकड संतोष वैज, सत्यपाल लाडगावकर हेमंत सावंत, अनिता सडवेलकर ,शरद देसाई, प्रसाद मसुरकर, माणिक पवार प्रसाद परूळेकर, स्वप्नील पाटील,शिवाजी वांद्रे, सागर फाळके, रुपेश बांदेकर, संजय सामंत, सुशांत पाटील,संजय भोसले, अविनाश कांबळे, नंदू पिळणकर, गिरीश गोसावी, रामचंद्र घावरे, राजाराम माने व इतर ६०पेक्षा अधिक जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य आणि तालुका पदाधिकारी तसेच शिक्षण विभागाचे कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी विठ्ठल इंफाळ व लिपिक आशालता गोसावी आदी उपस्थित होते.


या सहविचारसभेला उपस्थितींचे स्वागत संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर यांनी केले.
मात्र,सर्वप्रथम इतिवृत्त वाचन नाही तर, सभा घेता येणार नाही! अशी आग्रही भूमिका अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी मांडली.मात्र तांत्रिक अडचण असल्यामुळे इतिवृत्त सभेसमोर मांडता येत नाही अशी माहिती शिक्षणाधिकारी यांनी सभेला दिली. निदान पुढील सभेला इतिवृत्त वाचन होऊनच सभा सुरू करण्याच्या अटीवर सहविचार सभा सुरू झाली.


सर्वप्रथम माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन देत सदर निवेदन शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यापर्यंत पोहचवण्याची विनंती केली.
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी तब्बल दोन वर्षांनंतर संघटनेबरोबर सहविचार सभेचे आयोजन केले असून सध्य शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांचे विशेष आभार मानून,मागील प्रशासकिय अधिका-यांच्या कार्यप्रणालीवर जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली.
या सभेमध्ये अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली
यावर उत्तर देताना शिक्षणाधिकारी यांनी थकीत बीले एप्रिल पासून पाठवली जातील आणि ही सर्व थकित बीले जूलै अखेरपर्यंत पूर्ण केली जातील असे आश्वासन सभेला दिले.
तसेच एप्रिलमध्मे सर्व मेडिकल बिले 100टक्के पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बोर्ड परीक्षेच्या उत्तम कार्यावाहीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून स्तुती…

सध्या इ.१०वी व इ.१२वीच्या बोर्ड परीक्षा जिल्ह्यात सर्वत्र अतिशय शांततेत आणि सुव्यवस्थेत सुरू असल्याबद्दल, कोणत्याही ठिकाणी कसलाही अनुचित प्रकार झालेला नसल्याने जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी विशेष कौतुक सभेत केले.

उर्वरित इयत्तांच्या परीक्षाही नियोजनानुसारच…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांनी आपला सर्व अभ्यासक्रम शिकवून पूर्ण केलेला आहे तसेच 10 वी 12 वीची परीक्षा संपत आली आहे.
त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवार, रविवार जादा वर्ग घेण्याची आवश्यकता नाही.
तसेच परीक्षाही नियोजित वेळेत घेतल्या जाव्यात किंबहुना ती वेळेवर घेण्याचे आदेश मिळावेत असे जिल्हा अध्यक्ष वेतुरेकर यांनी सुचविले.

याशिवाय संघटनेच्या मागणीनुसार प्रत्येक कामाची चेकलिस्ट मार्चनंतर दिली जाईल असे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले.
शाळास्तरावरील सर्व प्रलंबित कामे एप्रिलमध्ये मागून घेणार असल्याचीही माहीती त्यांनी दिली.
सन.2017 -18 मध्ये समायोजन झालेल्या शिक्षकांचे मूळ शाळेत पुर्न: प्रत्यार्पण एप्रिल महिन्याच्या शेवटी केले जाईल असेही आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले.
याशिवाय सभेत अनुकंपा भरती बाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की,
‘अनुकंपा प्रस्ताव मागितले असून दोन महिन्यात योग्य कार्यवाही केली जाईल.
याशिवाय रजा रोखीकरण,नावात बदलांचे प्रस्ताव,सातवा आयोग दुसरा हप्ता,तसेच कांही शिक्षकांच्या वैयक्तिक प्रश्नावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर योग्य तो तोडगा काढून विविध कामांचा तात्काळ निपटारा केला जाईल असे आश्वासन शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी दिले.
तसेच पीएफच्या पावत्या मार्चनंतर मिळतील अशी ग्वाही शिक्षणाधिकारी यांनी या सभेला दिली.
तब्बल १८महिने श्री.मोहिते यांचा पगार बंद असल्याने कुटुंबाची हालाकिची परिस्थिती निर्माण झाली असून त्या प्रकरणावर स्वतः शिक्षणाधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी केली.
सभा संकलन व सभेचा थोडक्यात घोषवारा संघटनेचे जिल्हा पदाधिकारी डी.जे.मारकड यांनी घेतला. तर ही सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याबद्दल शिक्षणाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.
महिला आघाडी प्रमुख सुश्मिता चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानून सभेची सांगता झाली.

सिंधुदुर्गनगरी: माध्य. शिक्षणाधिकारी आणि शिक्षक भारतीच्या सहविचार सभेत मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख , संघटना अध्यक्ष व इतर पदाधिकारी.

प्रतिक्रिया व्यक्त करा