सावंतवाडी
आंबोली घाटात तब्बल शंभर फूट खोल दरीत चिरे वाहतूक करणारा डंपर कोसळल्याची घटना आज पहाटे घडली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान साधत गाडी बाहेर उडी टाकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शब्बीर शेख (रा.माणगाव) असे त्या चालकाचे नाव आहे. या घटनेची माहिती आंबोली दूरक्षेत्रचे हवालदार दत्ता देसाई यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेख हे आपल्या ताब्यातील डंपर घेऊन चंदगडच्या दिशेने चिरे वाहतूक करत होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घाटातून जात असताना त्यांच्या समोरून येणाऱ्या एका गाडीचा अंदाज न आल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. आणि त्यांची गाडी थेट शंभर फूट खोल दरीत कोसळली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी बाहेर उडी घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच आंबोली दूर क्षेत्राचे हवालदार श्री. देसाई यांच्यासह त्यांचे सहकारी दीपक शिंदे, राजेश नाईक, अभी कांबळे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. व दरीत उतरून गाडीत कोण नसल्याची खात्री केली. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.