इचलकरंजी
इचलकरंजी नगरपरिषदेने गाळेधारकांना केलेली अन्यायकारक भाडेवाढ व अनामत रक्कम वाढीच्या विरोधात गाळेधारक समितीच्या वतीने नगरपरिषद मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरु करण्यात आलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा जाहीर केला.तसेच गाळेधारकांना न्याय मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना कायम त्यांच्यासोबत राहिल , असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाने
आपल्या मालकीच्या इमारतींमधील गाळ्यांचे फेरनिर्धारण न करता पुन्हा चुकीच्या निर्धारणाच्या आधारे भाडे वाढ व जप्तीच्या नोटीसा देवून गाळे
जप्तीच्या कारवाया सुरु केल्या आहेत. सदरची कारवाई ही एकांगी व हुकूमशाही पद्धतीची असून लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याचा आरोप इचलकरंजी नगरपरिषद गाळेधारक समितीने केला आहे.तसेच या प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे गाळेधारक हवालदील झाले आहेत. त्यांच्या व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटूंब व नोकरवर्गाच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे इचलकरंजी नगरपरिषदेने त्रिसदस्यीस समिती निर्धारण दरानुसार लादलेल्या अन्यायकारक भाडे व अनामत रक्कम वाढीच्या विरोधात नगरपरिषद गाळेधारक समितीच्यावतीने गुरुवारपासून नगरपरिषदेच्या प्रवेशव्दारासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.तसेच
१ जानेवारी २०१८ पासून लागू केलेले भाडे हे अन्यायकारक असल्याने ते रद्द करून फेर मुल्यांकनानुसार नवीन भाडे १ एप्रिल २०२२ पासून आकारावे ,सध्या चालू असलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबवावी ,
सिल केलेले गाळे ताबडतोब उघडून व्यापा-यास व्यापार करण्यास परवानगी द्यावी , ३१ मार्च २०२२ रोजी अखेरचे थकीत भाडे नगरपरिषद कौन्सिल ठरावास अनुसरून जुन्या
भाड्याच्या रक्कमेवर २५ टक्केप्रमाणे वाढीव भाडे भरून घ्यावे ,
सर्व गाळ्यांना ९ वर्षे मुदतवाढ देवून त्याप्रमाणे नवीन भाडे करार करून द्यावेत ,अशा विविध मागण्या मान्य होईपर्यंत सदरचे बेमुदत साखळी उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार इचलकरंजी गाळेधारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.या उपोषणाला आज शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भेट देवून आपला पाठिंबा जाहीर केला.तसेच गाळेधारकांना न्याय मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना कायम त्यांच्यासोबत राहिल , असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळी संघटनेचे बसगोंडा बिरादार , सतीश मगदूम , विकास चौगुले , अभिषेक पाटील , अण्णासाहेब शहापुरे , हेमंत वणकुंद्रे यांच्यासह अन्य उपस्थित होते.