You are currently viewing सिंधुदुर्ग किल्ला होडी व्यावसायिक संघटनेचे सर्व प्रश्न सोडविण्यात येतील – बंदर विकास मंत्री अस्लम शेख

सिंधुदुर्ग किल्ला होडी व्यावसायिक संघटनेचे सर्व प्रश्न सोडविण्यात येतील – बंदर विकास मंत्री अस्लम शेख

मालवण

मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांबाबत आम. वैभव नाईक सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांच्याशी भेट घडवून लक्ष वेधले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी विविध प्रश्न मांडत ते सोडविण्याची मागणी मंत्री शेख यांच्याकडे केली. यावेळी मंत्री शेख यांनी याबाबत अधिवेशनानंतर मेरीटाइम बोर्ड व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन होडी व्यावसायिकांचे प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिल्याची माहिती मंगेश सावंत यांनी दिली.

कोरोना महामारी, लॉकडाऊन, शासकीय निर्बंध तसेच या सर्वामुळे पर्यटकांची रोडवलेली संख्या अशा विविध कारणांमुळे मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिकांचे नुकसान होऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासी होडी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष आम. वैभव नाईक यांचे लक्ष वेधले होते. संघटनेच्या विविध मागण्यांची दखल घेत आमदार नाईक यांनी आज मुंबई येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांच्याशी भेट घडविली. यावेळी संघटना अध्यक्ष मंगेश सावंत, स्वप्नील आचरेकर, आंतोन डीसोजा आदी उपस्थित होते.

या भेटीत आम. नाईक यांनी होडी व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत मंत्री शेख यांचे लक्ष वेधले. यावेळी अध्यक्ष मंगेश सावंत यांनी संघटनेच्या विविध मागण्या मंत्र्यांसमोर मांडल्या. यामध्ये मालवण बंदर जेटी ते सिंधुदुर्ग किल्ला जेटीकडे किती बोटी उभ्या करता येतील याची क्षमता निश्चित करण्यात यावी. तसेच आयव्ही ऍक्ट अंतर्गत १२ टन वजनाखालील बोटींची तपासणी/ सर्व्हे स्थानिक पातळीवर बंदर अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मार्फत मिळाल्यास परवाना नूतनीकरण करणे सोपे होईल. बोटीची प्रवासी क्षमता नेव्हल आर्किटेक्टच्या अहवालाप्रमाणे देण्यात यावा. आर्किटेक्ट प्लॅन करण्यासाठी ३० ते ३५ हजार रुपये खर्च करून सुद्धा १०+ २ अशी १२ प्रवाशांचीच क्षमता देण्यात येते, याबाबत शासनाने निर्णय घ्यावा.

तसेच मालवण बंदरात प्रवासी वाहतुकीच्या ७१ बोटी असून यात कोव्हिडं काळात ५० टक्के घट झाली. सध्याच्या बोटीची संख्या जास्त असून नवीन बोटीना परवाना देण्याचा विचार मेरीटाइम बोर्डाकडून होऊन नये अशा मागण्या मंगेश सावंत यांनी मांडल्या. यावर मंत्री शेख यांनी अधिवेशन झाल्यावर होडी व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले, अशी माहिती मंगेश सावंत यांनी दिली. तसेच याबाबत आमदार नाईक यांनी मंत्र्यांची भेट घडवून प्रश्न थेट मंत्र्यांकडे मांडण्यासाठी पुढाकार घेतल्याबाबत मंगेश सावंत यांनी आम. नाईक यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा