You are currently viewing स्री मन समजून घेतांना…

स्री मन समजून घेतांना…

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखिका कवयित्री प्राध्यापिका सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

स्री मन समजून घेतांना…

मोठा गहन विषय आहे हा ..! मला तरी” स्री मन”कोणाला समजले आहे नि ते कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केला
आहे, असे नाही वाटत ..(अपवाद सर्वच क्षेत्रात असतात.
त्या प्रमाणे कोणी भाग्यवतीच ठरावी जिला असा महाभाग
भेटला असावा).फार कठोर बोलते मी , पण माझा नाईलाज
आहे.आणि सत्य नेहमी कठोरच असते . ते पचवणे भल्या
भल्यांना जमत नाही तिथे आपण कोण…?

 

स्री ला नेहमी गृहितच धरले गेले आहे. अहो,(आजचा काळ
अपवाद) लग्ना सारख्या महत्वाच्या विषयात देखील तिची
मते विचारली गेली नाहीत. पूर्वी मुला मुलींना न विचारताच
घरातील वडिल मंडळी मुला मुलींची लग्ने ठरवित असत हे
तर तुम्हाला नक्कीच माहित असेल. हा मुलगा तुला पसंत
आहे काय ? एवढे कशाला? आम्ही तुझे लग्न ठरवित आहोत
हे साधे सांगण्याची तसदी ही घरातील मंडळी घेत नसत.
घरात चाललेल्या चर्चेवरून तिला कळे की तिचे लग्न ठरते
आहे. घरातील मुलगी म्हणजे मन नसलेली निर्जीव बाहुलीच..!
तिला एक मन नावाची गोष्ट असते हे कुणाच्या खिजगणतीतही नव्हते. ठरल्या दिवशी तिने फक्त बोहल्यावर
उभे रहायचे .. “ No Questions at all” अशी तिला अघोषित सूचना असायची नि, परंपरेनुसार ती इतकी अंगवळणी पडली होती की , चुकून कुणी चौकस मुलीने असा
प्रश्न केलाच तर … बाप रे.. घरात रामायण महाभारतच
घडत असे.

 

आणि परंपरेच्या वरवंट्याखाली दाबून मन नावाची गोष्टच
ज्यांची मरून गेली आहे किंवा मारून टाकली आहे अशा आमच्या आयाबहिणींचा त्यात पुरूषांच्या बरोबरीने पुढाकार
असे. अहो , मी अशी किती तरी अत्यंत विजोड जोडपी पाहिली आहेत की ज्यांची लग्ने केवळ गांव,घराणी पाहून
लावलेली आहेत .घरातल्या कर्त्या पुरूषा पुढे कुणाचे ही
चालत नसे, खुद्द मुलीच्या आई बापाचे सुद्धा..! मी जरा ही
अतिशयोक्ती करत नाहीये. ह्या घराघरातून घडलेल्या घटना
आहेत . मी स्वत: पाहिलेल्या, अनुभवलेल्या ….!

 

तुम्ही म्हणाल, आई वडिल मुला मुलींचे कल्याणच करतात ना ? हो , बरोबर आहे, कल्याणच करतात पण तरी तिला
काही ही कल्पना न देता तिचे परस्पर लग्न ठरवणे कितपत
योग्य आहे. मुलाला मुलगी पसंत आहे की नाही म्हणून तिला
दहा वेळा दाखवायची?काही ठिकाणी तर मुलाकडे तिला घेऊन जायची ? ना पसंतीची शिक्का घेऊन तिचा बाजार
मांडायचा ? का ? भाजीपाला होती ती ?हीच गोष्ट मग सर्व
क्षेत्रात घडली.. तिला कधीच कोणी काही विचारले नाही,
तिची परवानगी घ्यायचा तर प्रश्नच कधी आला नाही .
चुकून कोणी काही बोललीच तर ..” ए.. गप्प बस , तुझी
अक्कल ना चुली पुरती ठेव” ती चुली पुरती बरी चालत होती
यांना, राबवून घ्यायला, चोविस तास घाण्यासारखी.. मग
ते तर तिचे कामच आहे ..” महान विदुषी, ताराबाई शिंदे
१८ व्या शतकात ठणकावून विचारतात .. “काय हो तसे पत्र
तुम्ही ब्रह्मदेवाकडून आणले आहे काय”….”

आधुनिक युगात तुम्हाला वाटते आपण फार पुढारलो आहोत.
सर्वच क्षेत्रात स्रिया आघाडीवर आहेत . शिकल्या आहेत .
I T क्षेत्रात काम करताहेत . हो , सर्व बरोबर आहे… पण एका
प्रश्नाचे खरेखरे उत्तर द्या, घरात किती स्वातंत्र्य आहे ? विचारल्या शिवाय एकतरी गोष्ट करता येते ? कष्ट कमी झालेत? मुंबईत लोकल ट्रेन मधून दिवसभर धावणाऱ्या व
चतुर्थ श्रेणीतील लाकडाची मोळी संध्याकाळी काळजीने
घरी आणणाऱ्या, आपल्या सुशिक्षितांच्या घरात धुणे भांडी
फरशी करून घरी गेल्यावर नवऱ्याचा काही ही कारण नसतांना
मार खाणाऱ्या स्रिया मला दिसतात व माझे मन कळवळते,
कधी समजणार आहेत स्रिया … नि त्यांचे मन पुरूषांना…?
रोज उत्तम स्वयंपाक करून ही स्तुती तर सोडाच पण एखाद्या
दिवशी थोडे मीठ कमी जास्त झाले तर .. तुमच्या वर्षानुवर्षाच्या कष्टांवर पाणी तर फिरतेच वरून तू कशी
बेअक्कल आहेस हे लायकी नसणाऱ्यांकडून ऐकून घ्यावे
लागते.वरून लायकी नाही म्हणण्याची सोय ही नाही!

 

एक लक्षात ठेवा, हे सारे सोसून सोसून बधिर झालेली स्री केवळ नाईलाज म्हणून, लेकरांवरच्या अपार प्रेमापोटी, केवळ
त्यांच्यावरील आईचे छत्र जाऊन त्यांची ससेहोलपट होऊ नये
म्हणून घरात टिकून आहे . तिने सोसले नाही तर ..? निम्मे संसार
आजच मोडतील. स्रिया चुकत नाहीत असा माझा अजिबात
दावा नाही, पण त्या सोसतात, सामाजिक दबावाने.. “कोण
काय म्हणेल” या भीती पोटी त्या नको त्या संसाराला चिकटून
राहतात हे कोणी मान्य करो अथवा न करो हेच सत्य आहे.
खूप जीव लावणारी, प्रेम करणारी जोडपी ही असतील, असोत
बिचारी! आपल्याला आनंदच आहे. असेच व्हावे असेच तर
आपल्याला वाटते ना? पण देखावा किती नि खरेच ..खरे किती हा ही अनुत्तरीत प्रश्न आहे .

 

देव करो नि स्रियांना खरोखर सुखाचे दिवस येवोत, त्यांची
मुस्कटदाबी कमी होवो..त्यांना मन असते हे सगळ्यांच्या
लक्षात येवो , निदान तसा प्रयत्न होवो अशी अपेक्षा करून
थांबते.रागावणाऱ्या नजरा मला दिसताहेत .. पण माझा
नाईलाज आहे मंडळी, खरे बोललेच पाहिजे ना ?
आणि किती ही राग आला तरी माझ्यावर न रागवता मी
सांगते ते केले तर तुमच्यासाठी राबणारी, तुमच्याशी ओळख ही नसतांना प्रेम करणारी , आई वडिलांना कायमचे अंतरणारी,
नव्या घराला माणसांनाच आपलं मानणारी,तुमची अर्धांगीनी
किती खुश होईल व सुखावेल याचा विचार करून मला माफ
करून टाका ना सर्वजण..हो,( काही महिला ही पटलं तरी
उगीच रागावतील माझ्यावर हे ही माहीत आहे मला..!)
आम्ही पतीभक्ती (पती प्रेम करो न करो) दाखवण्यात फार
अग्रेसर ना ? असो, आता थांबतेच …

धन्यवाद …

आणि हो, नेहमी प्रमाणे ही फक्त आणि फक्त माझीच
मते आहेत …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १८ मार्च २०२२
वेळ : दुपारी ४:४४

प्रतिक्रिया व्यक्त करा