You are currently viewing सातोसेतील बेकायदा वाळू उपसा रोखा, अन्यथा “जलसमाधी” घेवू…

सातोसेतील बेकायदा वाळू उपसा रोखा, अन्यथा “जलसमाधी” घेवू…

सावंतवाडी

गोवा-तोरसे येथील वाळू तस्करांकडुन सातोसे गावातील तेरेखोल खाडीत बिनदिक्कत बेकायदा वाळु उपसा सुरू आहे. त्यामुळे घरासह शेती-बागारतीला धोका निर्माण झाला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या स्थानिक लोकांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे या प्रकारासह वाळू उपसा रोखावा, अशी मागणी सातोसे ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. दरम्यान स्थानिक प्रशासन, सरपंच कोणीच यावर बोलण्यास तयार नाही. त्यामुळे आता आम्ही हैराण झालो असून, हे प्रकार रोखले न गेल्यास आम्ही खाडीतच “जलसमाधी” घेवू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी रवींद्र सावंत, कृष्णा कळंगुटकर, विलास सावंत, अर्जुन रेडकर, शिवराम पंडित, हेमंत वेंगुर्लेकर, प्रशांत मयेकर, विलास रेडकर, सचिन साळगावकर, समीर म्हालदार, नीलेश कळगुटकर, शेखर पेडणेकर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ते म्हणाले, सातोसे हद्दीतून जाणाऱ्या तेरेखोल नदीपात्रात गोवा-तोरसे येथील वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. त्यामुळे आमच्या शेती-बागायतीला त्याचा धोका पोहोचत आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या उत्खननामुळे एकरामध्ये शेतजमिनींचे नुकसान झाले आहे. याबाबत जाब विचारणाऱ्यांना त्यांच्याकडून धमकावले जात आहे. तसेच हल्ला करण्याचेही प्रकार वाढले आहेत. त्यामुळे आता याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष घालावेत, आणि आमचा ग्रामस्थांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आमच्यावर खाडीतच जलसमाधी घेण्याची वेळ येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा