You are currently viewing स्री मन जाणून घेतांना ….

स्री मन जाणून घेतांना ….

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

स्रियत् चरित्रं पुरूष्यस्य भाग्यं देवो न जानाती
कुतो मनुष्य: ..

असं म्हणतात … खरंच स्री इतकी गूढ आहे का ? तसं म्हणाल
तर गूढ कोण नाही ..? प्रत्येकच माणूस म्हणाल तर गूढ आहे.
हिमनगाचं जसं टोक फक्त वर दिसतं त्या प्रमाणे प्रत्येक माणूस आहे. आणि स्रियांचं म्हणाल तर …तिचं
एकूण जीवनच इतकं अवघड आहे की , काय सांगावं नि काय
लपवावं हे ठरवण्यातच तिची जिंदगी निघून जाते.निसर्गानेच
स्रियांना एवढे जखडून टाकले आहे की,तिची बाल्यावस्था संपे
पर्यंतच तिला थोडाफार मोकळा श्वास घेता येतो. बाकी पुढे मग आयुष्यभर “ आनंदी आनंदच असतो”

 

किती असे जोडीदार आहेत की, ते स्रियांना समजून घेतात ?
किंबहुना मी तर असे म्हणेन की, कुटुंबातले किती जण स्रियांना समजून घेतात ?जोतिराव फुले हे एकमेव गृहस्थ
मला असे दिसतात की, त्यांनी सावित्रीला समजून घेतले.
नाही तर आपले गांधीजी ही बायकोला संडास धुवत नाही
म्हणून भर रात्री हात धरून बाहेर काढतात. व आत्मचरित्रात
फुशारकी मारतात की, मी क्रोधावर कसे नियंत्रण मिळवले
व कस्तुरबाला आत घेतले.काका साहेब कालेलकरांनी ही
गोष्ट जेव्हा कस्तुरबांना सांगितली तेव्हा त्या म्हणाल्या “
त्यांनी त्या दिवशी माझ्या पेकाटात लाथ ही घातली होती
हे त्यांनी आत्मचरित्रात लिहिले का ? का नाही लिहिले?
कस्तुरबा काय गांधीजींची प्रॅापर्टी होती काय ? वाटेल तशी
वापरायला? अहो, तिला नाही धुवायचे संडास? तुमची जबरदस्ती का? तुम्ही कमवा नाव , व्हा मोठे, तिची फरपट
का करता? कोण विचारणार हे प्रश्न? ते ही गांधीजींना?
वरून म्हणे मी क्रोधावर कसे नियंत्रण मिळवले हे भाषणातून
सांगतात ..मला वाटते, पुरूष स्रियांना किती समजून घेतात
हे कळण्यासाठी एवढे एक उदा . पुरेसे आहे , जास्त बोलण्याची गरज नाही.

 

तीच गोष्ट दागिन्यांची.तिचे सगळे दागिने स्रीधन गांधीजींनी
मोडले. देशासाठी त्याग करू नये असे कोणी ही म्हणणार नाही.करावाच, जरूर करावा, पण तिथे ही आडमुठ्ठे पणा ! एक हार तरी माझ्यापाशी माहेरचं माझं स्रीधन आठवण म्हणून
राहू द्या, पण नाही. “बा” खूप झगडली पण शेवटी तिला हार
मानावी लागली. किती त्रास झाला असेल तिला? कुठे जाणार? कुणाशी बोलणार ? हाच बायकांचा मोठा प्रश्न आहे.
नाइलाज हाच बायकांचा इलाज आहे.आयुष्यभर काबाडकष्ट
करूनही तू खूप राबलीस , कधी ही पुरूषांच्या तोंडून बाहेर पडत नाही.. हो,लगेच बायका शेफारतील ना ?

 

बघा मंडळी , ज्यांना आपण अहिंसेचे दूत म्हणून गौरवतो
ते सुद्धा किती सामान्य होते. बायकांना त्यांची स्वतंत्र मतेच
नसतात किंवा ती असू नयेत असेच पुरूषांना वाटते. त्यांनी
सतत आपल्याच ओंजळीने पाणी प्यावे असे त्यांचे ठाम मत
असते. आपण उठ म्हटले की उठावे बस म्हटले की बसावे !
तिला स्वत:चे मत असूच नये किंवा असले तरी तिने दाखवू ही
नये असे पुरूषांना वाटते. “ ए , गप्प बस , तुला काय कळते?”
जशी सगळी अक्कल परमेश्वराने त्यांनाच दिली आहे असे
त्यांना वाटते. त्या मुळे आपल्या बघण्यात तरी असे सहिष्णू
पुरूष फार कमी आहेत हेच सत्य आहे.

 

अशा किती नशिबवान स्रिया असतील की त्यांना समजून
घेणारा नवरा व कुटूंब मिळत असेल? स्रिया सतत मन मारतात,तडजोडी करतात म्हणूनच नव्वद टक्के संसार टिकतात. जिथे तडजोड होत नाही, ते संसार मोडतात. कोणी
तरी एकाने(जास्तकरून स्रियाच)तडजोड केली तरच मग निभाव
लागतो.नाहीतर मुलाबाळांवर अन्याय होऊन एकटेपणाचे दु:ख्ख पदरी येते, शिवाय विभक्त झाल्यावरची वाट तर
आणखीनच काटेरी असते, त्यापेक्षा ही मुस्कटदाबी बरी असे
वाटून स्रिया मुलांकडे पाहून दिवस काढत असतात. उच्च काय
नि चतुर्थ श्रेणी काय ? काही फारसा फरक नाही. चतुर्थश्रेणी
स्रियांची परिस्थिती अधिक दयनीय होते कारण नवरा फक्त
दारू पिऊन मारझोड करतो, कुटूंब कष्ट करून तीच पोसते.
अशा ठिकाणी … मन…? ते ही समजून घेणे?”अग , येडी का
खुळी तू? हे मनबिन काय घेऊन आलीयास ? कुठून आणलयां
हे खुळ “ गपगुमान ऱ्हाय बरं ? लई गमज्या करू नको … हं ऽऽ
सांगून ठेवतुया .. वरून पुन्हा दोन लाथा आहेतच !

 

कळलं का मंडळी , बऱ्याच लोकांना स्रियांना मन असतं, त्या
संवेदनशील असतात हेच माहित नसतं किंवा ते ठरवून नाकारतात.यात स्रिया सर्वगुणसंपन्न असतात असा माझा मुळीच दावा नाही. अपवाद तर सर्वच क्षेत्रात असतात ना ?
स्रियाही दोषी असतात पण सोशिक जास्त असतात.
आपल्या घराची वैगुण्ये बाहेर दिसू नयेत हाच त्यांचा प्रयत्न
असतो.म्हणतात ना “झाकली मूठ सव्वा लाखाची …!”
देव करो नि प्रत्येकच स्रिला समजून घेणारा प्रेमळ नवरा मिळो अशी अपेक्षा करते नि थांबते ..हो, मला माहित आहे
बऱ्याच भुवया वक्र होणार आहेत हा लेख वाचून…!
होऊ देत , काय फरक पडतो? ही मंडळी काय बदलणार आहेत असे वाटते तुम्हाला? अजिबात नाही. अहो, अरेरावी
तर यांच्या नसानसात मुरली आहे, पिढ्यान् पिढ्या …
असो.. “आलिया भोगासी असावे सादर …”

धन्यवाद ….

आणि हो … नेहमी प्रमाणे ही फक्त माझीच मते आहेत बरं …
माझ्या मतांशी सहमत होण्याचा माझा जरा ही आग्रह नाही.

प्रा.सौ.सुमती पवार
(९७६३६०५६४२)
दि : १५ मार्च २०२२
वेळ : दुपारी २ : ५० रासेगांव

प्रतिक्रिया व्यक्त करा