You are currently viewing स्त्री

स्त्री

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा महिला दिनाच्या निमित्ताने लिहिलेला ललित लेख

सौंदर्याची परिपूर्णता म्हणजे स्त्री…..
सौंदर्याची खाणच जणू…मृगनयनी…मीनाक्षी… गव्हाळ वर्ण…नाजूक कमनीय बांधा…लांबसडक रेशमी कुंतल…रेंगाळती पाठीवर…हवेत उडती…पवन स्पर्शाने…नाकात नथनी…मोत्यांची जोडी..कर्णीयांत डुल… लटके गालांशी खेळती… चंद्रकोर भाळी…भांगात कुंकू….गळा शोभे लेणे सौभाग्याचे…हिरवा चुडा हाती सुवर्ण कंकण तोडे….भरजरी काठ… गोलाकार साडी…गाल गुलाबी…अधरावर लाली…गालावरच्या खळीला शरमेने सांभाळी…
पुरातन वास्तुशिल्पे….वेद कालीन युगातील माहिती….चित्रांमधून स्त्रिया आपली सुंदरता….सौंदर्य…विविध अंगाने दाखवीत होत्या…कथा कादंबरी मधून स्त्रीचं रेखीव रूप रेखाटलं गेलं आहे…स्त्री सौंदर्याचे अनेक आविष्कार चित्रांमधून अनुभवता येतात…संगीतातून लयबद्ध होताना दिसतात…म्हणून तर स्त्री ही सौंदर्याने नखशिखान्त नटलेली सौंदर्यवती…..लावण्य लेवुनी लाजणारी….हसणारी… खिदळणारी लावण्याची खाण… लावण्यवती…..चंद्रासम गोल….गोड गोजीरा…गोरा सावळा मुखडा…भाळी चंद्रकोर…हसरा चेहरा..जणू चंद्रमुखी…अशा एक ना अनेक उपमांनी ओळखली जाते….स्त्रीच्या सौंदर्याचे उमटणारे भाव ती आपल्याच वागण्यातून सांगून जाते…
*मी कशाला आरशात पाहू गं*
*मीच माझ्या रूपाची राणी गं*
स्त्रीचा मनाला भुरळ घालणारा…नजर तिच्यावरच खिळवून ठेवणारा… एकाच कटाक्षात घायाळ करणारा…लक्ष विचलित करणारा…देहभान विसरून तिच्याच प्रेमात गुंतवून ठेवणारा…मोगऱ्याच्या गजऱ्याने कुंतलेही….मोहून सोडणारा…. गालावर लाजेनेच लाली आणणारा…अधरांमधुनी शराब सांडणारा….आणि अतृप्त होऊन अधर… अधारांशी भिडविण्यास….आसक्त असणारा…तिचा साजशृंगार… तिचे सौंदर्य…गुलाबाच्या काट्यांची पर्वा न करता हिरव्यागार देठावर फुललेल्या..बहरलेल्या तांबड्या बुंद गुलाबासारखं….अप्रतिम… अवर्णनीय…गुलकंदा सम…बकुळीच्या नाजूक फुलासारखं कोमल….अन आयुष्यभर साथ देणाऱ्या सुगंधासारखं….सुगंधी…कष्टात…त्रासात ठेवा अथवा ठेवा श्वासात…नेहमीच सुगंधाची उधळण करणारं….स्त्रीचं लावण्यखणी रुपडं मनावर प्रतिबिंबित होणारं…लावण्याचा ठसा उमटवणारं…निखळ सौंदर्याचं दर्शन देणारं…
स्त्री…माता….भार्या….बहीण…कन्या…एक एक रूप महानतेचं दर्शन देतं…
*माता बनुनी बाळाला*
*जीवापाड प्रेम द्यावं*
*माझं जीवन माझ्या*
*लाडक्या बाळा लाभावं*
असं म्हणत….पदर खोवून बाळाचे संगोपन करणारी स्त्री…आपल्या मुलांसाठी जीवन अर्पण करण्यासही तयार असते… स्त्रीचं मातेचं रूप उलगडताना….स्त्रीचं आईपण शब्दबद्ध करणारं….प्रेमस्वरूप आई…वात्सल्यसिंधु आई…म्हणत बरंच काही सांगून जातं….स्त्रीचं आईरूप वात्सल्य…मायेचं अनोखे दर्शन देऊन जाते….!

*गोड गोजिरी लाज लाजरी…ताई तू होणार नवरी..*
मायेचा धागा मनगटी बांधुनी…प्रेमाचा आधार भावाचा मागुनी… आसवांना पापण्यांच्या आड लपवुनी…सुख भावाचं आपुल्या डोळ्यात साठवुनी…रूप बहिणीचं साजरे…. नात्या नात्यात गोजिरे… आईचंच प्रतिबिंब… बहिणीच्या चेहऱ्यामध्ये…अशी नात्याचा ओलावा कायम ठेवणारी स्त्री म्हणजेच… बहीण….!

*एक लाजरा न साजरा मुखडा….चंद्रावानी खुलला गं*
*राजा मदन हसतोय कसा…की जीव माझा भुलला गं..*
असं म्हणत…भावगीत…प्रणयगीत…लावणी…मधून स्त्रीचं सात्विक,सोज्वळ रूप उलगडताना…मर्दानी…परंपरेचा मागोवा घेत कर्त्या पुरुषाच्या मागे समर्थपणे राहणारं स्त्रीचं रूप म्हणजे भार्या…पत्नी…आपल्या रूपाने…रातराणी सारख्या मंत्रमुग्ध करणाऱ्या रातराणी सुगंधाने…पुरुषाला मोहून टाकणारी… बाहुपाशात घेत….आपली हृदयात बंदिवान करणारी…स्त्री म्हणजे पत्नी…अर्धांगिनी…!

घराचं सुख….घरची लक्ष्मी….धनाची पेटी… कन्या…
*दिल्या घरी सुखी राहा*
*लेकी तू परक्याचं धन*
*कन्यारूपी स्त्रीचं फुलवी*
*घरदार नि अंगण*
प्राजक्त आपल्या अंगणी लावावा…रात्रीच्या अंधारात प्राजक्ताने फुलून यावे….आपल्या अमूल्य…अलभ्य सुगंधाने आसमंत दरवळून सोडावे…अन पहाट होताची….दुसऱ्याच्या अंगणी सांडावे…. प्रेम..माया…सुगंध माहेरास द्यावे…अन अंगण पतीचे सजवावे…अगदी तशीच असते कन्या….बापाचं काळीज असते कन्या…आईचं रूप असते कन्या…भावाची मैत्र असते कन्या…बहिणीची सखी असते कन्या…!

*अशी लक्ष्मी रूपे स्त्रीची..*
*देवी सम तिची रहाणी…*
*लागे का मग सांगावी…*
*तिच्या स्त्रीत्वाची कहाणी…*

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − ten =