You are currently viewing जागतिक महिला दिन….८ मार्च….सन्मान महिलांचा…महिलांच्या कर्तृत्वाचा

जागतिक महिला दिन….८ मार्च….सन्मान महिलांचा…महिलांच्या कर्तृत्वाचा

संपादकीय….

जागतिक महिला दिन….८ मार्च….सन्मान महिलांचा…महिलांच्या कर्तृत्वाचा

खरंतर महिला दिन हे औचित्य आहे, उगवणारा प्रत्येक दिवस हा सुरूच होतो महिलांच्या कर्तव्यदक्षतेपासूनच… ८ मार्च जागतिक महिला दिवस… महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करतात. महिलांच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस. आई, भगिनी, पत्नी, मुलगी, वहिनी, मावशी, आत्या, मैत्रीण… अनेक रुपात आयुष्यात महिलेचा सहभाग हा असतोच. जन्म देणारी आई, पालनपोषण करून चालायला, बोलायला शिकवणारी आई… माया ममतेचा आगर जिच्या हृदयी सदैव असतो ती आई म्हणजेच साक्षात परमात्मा रूप….वात्सल्यसिंधु…. प्रेमस्वरूप आहे. आपल्या बाळासाठी आपले जीवन त्यागणारी आई….!
स्त्री बहिणीच्या रुपात असेल तर ती प्रेमाचा झरा आहे, आईचं प्रतिबिंब बहिणीच्या चेहऱ्यावर दिसतं. आपल्या आयुष्यात भावावर निस्सिम प्रेम करणारी, त्याच्या सुखासाठी प्रार्थना करणारी स्त्री म्हणजे बहीण….!
स्त्री पत्नी असेल तर संपूर्ण त्यागाचं, समर्पणाचं प्रतिक आहे. पतीच्या सुखातच आपलं सुख शोधणारी, सोशिकतेचा परमोच्च बिंदू. आपल्या पतीला सर्वोच्च सुख देण्यासाठी आपलं सुख न्योछावर करणारी स्त्री म्हणजे पत्नी…!
वहिनी भावनेचा सागर, मावशी, आत्या, मामी स्नेहाचे झरे. अन मुलगी बापावर सर्वोच्च प्रेम करणारी स्त्री. परक्याचं धन असलं तरी बाप स्वतःपेक्षा मुलीवर जीव ओतून प्रेम करतो….म्हणून तर मुलगी बापाचा चेहरा म्हणतात….
तर स्त्री मैत्रीण असेल तर सुखाची, विश्वासाची मूर्ती.
स्त्री प्रेमात राधा बनली, संसारात जानकी तर कधी दुर्गा…काली बनून शिर सुद्धा धडावेगळे केलं. अशाच कणखर आणि खंबीर महिलांना आज सलाम करावासा वाटतो, ज्यांनी काम, कष्ट करून घाम गाळून छोट्यामोठ्या प्रमाणात का होईना स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावला आहे. नेटाने आपले घरसंसार चालवतात आणि देशाच्या उन्नतीमध्ये आपला वाटा उचलतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशाच काही महिला आहेत ज्या राजकारणात, उद्योग व्यवसायात, विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात हिरहिरीने काम करताना पहायला मिळतात. कित्येक स्त्रिया आज मानाने गावाच्या सरपंचपदी विराजमान असून गावाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात बचतगटांची स्थापना करून अनेक महिलांनी रोजगाराची दालने उघडली आहेत. कित्येकांच्या हातांना कामे दिली आहेत. छोटे छोटे उद्योग उभारून इतर महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे.
जिल्ह्यातील काही महिलांनी उद्योग व्यवसायात उतरत उद्योगपती सन्मान मिळवला आहे, गावाच्या, तालुक्याच्या बेरोजगार तरुण तरुणींसाठी व्यवसाय उभारत बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न केला आहे. काहींनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे. समाज सुधारणेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कर्तबगार महिला आपली शेती बागायती सांभाळून, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून देखील काम करताना दिसतात. स्वतःबरोबर इतर गावातील महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा या सर्व कष्टकरी खंबीर महिलांना जागतिक महिला दिनी संवाद मीडियाचा सलाम....

स्त्री….
करुणेचा सागर,
ममतेचा आगर,
मायेचा झरा,
जीवनाचा…
आधार खरा.
आईची माया,
बहिणीचं निस्सिम प्रेम,
पत्नीचा त्याग,
मैत्रिणीचा अढळ विश्वास…
आपल्या आयुष्यात,
आई, ताई, पत्नी, मैत्रीण, मुलगी, मावशी, मामी, आत्या, काकी
स्त्रीत्वाच्या प्रत्येक रुपात भेटते….
त्या प्रत्येक स्त्रीशक्तीला….
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

(दिपी)🖋️
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा