आरोग्य विभागाकडून धनगर समाजावर अन्याय..
धनगर समाजाच्या राखीव जागेवर दुसऱ्याच्या प्रवर्गातील कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पदोन्नती दिल्याचे उघड झाले आहे. धनगर समाजावर हा अन्याय असून त्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी ऑल इंडिया धनगर महासंघाने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे केली आहे. तसेच चौकशी करून कारवाई न केल्यास आंदोलन छेडू असा इशारा ही ऑल इंडिया धनगर महासंघाने दिला आहे.
महासंघाचे कोकण प्रदेश अध्यक्ष नवलराज काळे यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत निवेदन सादर करून लक्ष वेधले आहे. आरोग्य विभागाकडील भटक्या जमाती ‘क’ म्हणजेच धनगर समाजाच्या राखीव जागेवर भटक्या जमाती ‘ब’ म्हणजे गोसावी व इतर समाज प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली गेली आहे. त्यामुळे धनगर समाजावर हा अन्याय आहे.
भटक्या जमाती ‘क’ या राखीव जागेवर भटक्या जमाती ‘ब’ प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत कोणतेही शासन निर्णय नसताना जाणीवपूर्वक धनगर समाजाच्या आरक्षणावर अन्य प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली गेलेली आहे. हे कागदपत्रा आधारे उघड झाले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत सविस्तर चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी. अन्यथा नियम धाब्यावर बसवून धनगर समाजावर अन्याय करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार करू असा इशारा महासंघाने केला आहे.