“जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच”…. “लालित्य नक्षत्रवेल” समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा बालपणीच्या आठवणी जाग्या करणारा लेख
“बालपण देगा देवा”….खरंच, छोट्या मुलांना बागडताना, खेळताना, मजा मस्ती करताना पाहिलं की, बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोर तरळतात….आणि मनातून आपोआपच शब्द फुटतात…
*बालपण देगा देवा*
बाळ जन्माला आल्यावर आई त्याला जीवापाड जपते…बाळाला नजर लागू नये या खुळ्या समजुतीने गोऱ्या गोबऱ्या गालावर काजळाचा टीका लावून त्याचे गालगुच्चे घेते….कोमल हात आपल्या हातात घेऊन त्याच्याशी बोबडे बोल बोलते…बाळ अजाण असतं… पण आईच्या हावभावावरून ते आईला हुंकार देतं….शब्दाविन ते इवल्याशा डोळ्यांनी आईशी बोलतं….आईचा आनंद तेव्हा गगनात मावत नाही….आई आणि मुलाचं हे गोड नातं पाहणाऱ्याला…मनोमन वाटून जातं…. मी ही छोटा असताना असंच केलं असेल ना आईने?… अन पुन्हा एकदा छोटं व्हावंस वाटून जातं…
*लहानपण देगा देवा*
*मुंगी साखरेचा रेवा*
लहानपण कोणाला नकोय…ती मस्त…मजा दुसऱ्या कशातही नाही…बालपण म्हणजे फुलांवर बसून मनसोक्त मध प्राशन करणाऱ्या…हवेत घिरट्या घेत स्वच्छंदी विहार करणाऱ्या फुलपाखरांसारखे ….अजाण, पण… मनमोहक.. आनंदी….जीवन.
निसर्गातील सौंदर्य मनसोक्त लुटावं…नजरेत साठवावं… शब्दांमध्ये व्यक्तही व्हावं पण सौंदर्य म्हणजे काय?
हे देखील न समजणारं वय….जाई-जुईने बहारावं… पानापानातून फुलून यावं…जणू झाडाने शुभ्रधवल वस्त्र नेसावं आणि नुकत्याच तारुण्यात आलेल्या नवतरुणी प्रमाणे बागेत लाजत मुरडत…मनातल्या मनात हसत…गोऱ्या गालावर छानशी खळी पाडून लाज सांडत उभं रहावं आणि येता जाता सर्वांचं ध्यान आपल्याकडे खेचून घ्यावं…आपल्या लीलांनी मन मोहून टाकावं…अगदी तसंच….असतं बालपण….
बालपणीच्या लीला…वस्त्रालंकार…गालातल्या गालात गोड हसणं… बोबड्या बोलांनी सर्वानाच आपलंसं करणं…नात्यांना नवनव्या नात्यांनी जोडणं…यामुळे प्रत्येकजण कुरवाळतो…गालगुच्चे घेतो…जमिनीवरून विश्व दिसत असेलही….पण आपल्या खांदावर घेऊन जग दाखवतो….तर कधी मजेमजेत….कानाजवळ दोन्ही हातांच्या तळव्याने पकडून मामाचे घर दाखवतो….जणू काय मामाने गाव त्याच्या नजरेच्या समोरच असतं…. अगदी तसंच असतं बालपण…..न दिसणारी….अशक्यप्राय गोष्टही आपल्या नजरेनं पाहणारं… प्रत्येकाला हवं असतं असंच उनाड बालपण…
“मी नाही देणार माझं चॉकलेट” म्हणत मूठ घट्ट आवळत “पॅक पॅक” वाजणारे बूट घालून आपल्याच धुंदीत फिरणारे…घंटा वाजवीत येणाऱ्या माणसाकडून काठीला गुंडाळून दिलेला दहा, वीस पैशांचा गोड गुलाबी साखरेचा कापूस खाणारे ….बोटातील खडूलाही वडिलांच्या हातानी गिरवणारे….उन्हाचा दाह सहन न झाल्याने पानगळ होऊन पानांनी साथ सोडलेल्या चिंचेच्या झाडावर लटकणाऱ्या चिंचा दगडाने पाडून…. जिभेने लाळ सांडेपर्यंत चुपक्या मारून खाणारे….अन….
*मज आवडते हि मनापासुनी शाळा*
*लाविते लळा हि जशी माऊली बाळा*
असं बडबड गीत गाणारे… ते अवखळ बालपण…हरवलं आणि वाटू लागलं…
*कशाला आलं हे आपल्याला शहाणपण*
*हरवलं ज्यात ते सुंदर बालपण…*
खरंच… बालपणीचा काळ किती सुखाचा होता?….काट्यांनी वेढलेल्या गुलाबाच्या देठावर नाजूक गुलाब कळीने जन्मा यावे….बहरावे…उमलून…फुलुनी यावे…अन कळीचे हळूच फुल व्हावे….पण काट्यांमध्ये फुलल्याचे तिज कधीही न कळावे…असंच होतं बालपण…नासमज…. अल्लड अवखळ…
“खंड्या” पक्षाने…..लकलकणाऱ्या… वाऱ्यावर तरंग उठणाऱ्या स्वच्छ पाण्यात…हवेतून सूर मारत डुबकी मारावी….अन अलगद माश्याला आपल्या चोचीत पकडून दूर हवेत पुन्हा उडुनी जावे….असंच खेळकर…मिळेल त्यावर ताव मारणारे होते….बालपण.
अमावस्येच्या अंधाऱ्या रात्रीत गायब झालेल्या चांदोबाला शोधत फिरणारे बालपण…काळ्याकुट्ट ढगांच्या आडोश्याला लपणाऱ्या चांदोबाला प्रश्न करणारे बालपण….आज हरवलंय….अन तो लपाछपी खेळणारा चांदोबाही…
*चांदोबा चांदोबा कुठे रे गेलास?*
*दिसता दिसता गडप झालास*
*हाकेला ओ माझ्या देशील का?*
*पुन्हा कधी मला दिसशील का?*
म्हणता म्हणता…बालपणीचे ते दिवस कधीच सरून गेले….बालपणीच्या त्या आठवणी मनात खोलवर असतात दाटलेल्या….छोट्या छोट्या मुलांना खेळताना…बागडताना पाहिलं की, समोर येतात….एखाद्या सिनेमामध्ये भूतकाळ दाखवतात तशाच….कृष्णधवल रंगात…मळक्या कपड्यांनी…घामेजलेल्या अंगाने…हातात पिड्याची बॅट (माडाच्या झावळीची) ….आणि आपटून धोपटून चेपलेला प्लास्टिकचा बॉल घेऊन….
बालपणीच्या आठवणींना गोंजारलं की मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेल्या आठवणी येतात नेत्रपटलांवर….म्हणून केव्हातरी बसावं….आणि….स्वतःच्याच मनाशी बोलावं…
मनाशी बोलायला वेळ असतो का कुणाला…?
कधीतरी विचारावं….”जत्रेतून आणलेली ती पत्र्याची शिट्टी वाजवून किती दिवस झालेत? टिक टिक आवाज करणारी पत्र्याची बेडकी कधी दिसलेली शेवटची? चिंचेच्या झाडाखाली….पाडलेल्या चिंचा कधी चुपल्या होत्या जिभेवर लाळ येईपर्यंत?…ना गलीत (छोटा खड्डा) गोट्यांनी खेळलो….ना विटी दांडी जोरात पेलली….ना डावाला काजू लावल्या… आठवतंय का?….सावरीच्या झाडावरून अलगद निसटून उडणारी म्हातारी कधी धरली होती चिमटीत?….ती उडणारी कापसाची म्हातारी केव्हाच उडून गेली…..अन आपल्या सोबत आमचे बालपण देखील घेऊन गेली…
*बालपणीचे दिवस सुखाचे…*
*पुन्हा न येती वाट्याला…*
*फुलपाखरां सवे उडावे…*
*वाटे या बाल मनाला…*
©【दिपी】🖋️
दीपक पटेकर…सावंतवाडी
सिंधुदुर्ग..८४४६७४३१९६