इचलकरंजी / प्रतिनिधी :
जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून समाजातील गरिब व गरजूंच्या मदतीसाठी कायम कार्यरत असलेल्या माणुसकी फौंडेशनला इचलकरंजी शहरातील सरस्वती हायस्कूलच्या वतीने दलित मित्र काकासाहेब माने स्मृतिदिनानिमित्त सेवाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते तसेच जिल्हा बँकेच्या संचालिका माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
समाजातील युवकांना संघटित करून त्या संघटीत शक्तीचा विधायक कार्यासाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते रवी जावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी माणुसकी फौंडेशनची स्थापना केली. या फौंडेशनच्या माध्यमातून अनेक अनाथ निराधार व्यक्तींना मायेचा आधार देत त्यांच्या निवार्याची सोय केली. तसेच रात्री अपरात्री विविध अपघातांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये तातडीने अत्यावश्यक वैद्यकीय उपचार करुन त्यांना जीवदान दिले आहे. हे कार्य सुरू ठेवतानाच नदी व विहिरीतील मृतदेह बाहेर काढणे , बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे, गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे. तसेच विविध मूलभूत समस्यां विरोधात आवाज उठवून त्याच्या निर्गतीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे. आयजीएम व शासकीय रुग्णालयांमध्ये गरजूंना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा पुरवणे अशा विविध माध्यमातून निरपेक्ष सामाजिक कार्य सुरू ठेवत समाजासमोर सामाजिक बांधिलकीबरोबरच खऱ्या माणुसकीचे दर्शन घडवले आहे. या कार्याची दखल घेवूनच इचलकरंजी शहरातील सरस्वती हायस्कूलच्या वतीने दलित मित्र काकासाहेब माने यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून माणुसकी फौंडेशनला एका शानदार समारंभात ज्येष्ठ विचारवंत राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते तसेच जिल्हा बँकेच्या संचालिका माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली सेवाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी जावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्विकारला. तसेच मान्यवरांच्या हस्ते हायस्कूलच्या क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात माणुसकी फौंडेशनचे निरपेक्ष भावनेने सुरू असलेले सामाजिक कार्य हे सर्वांसाठी आदर्शवत व प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले. या कार्यातून प्रेरणा घेऊन सर्वांनी विधायक कार्य करून समाज विकासात योगदान द्यावे असे आवाहन केले. या कार्यक्रमास काकासो माने मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष अमरसिंह माने, उपाध्यक्ष संभाजी काटकर, सेक्रेटरी शिवाजी जगताप, जॉइंट सेक्रेटरी पृथ्वीराज माने, प्रशासक व सदस्या सौ. व्ही. एस.काटकर, सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. डी. शिंदे यांच्यासह माणुसकी फौंडेशनचे सर्व सदस्य तसेच सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व नागरीक उपस्थित होते.