You are currently viewing तारक की मारक…

तारक की मारक…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख*

*नवोदित साहित्यिकांसाठी दिले जाणारे पुरस्कार ..*

*तारक की मारक…*

 

 

खूप छान विषय आहे, विचार करायला लावणारा आहे.

प्रत्येक लिहिणाऱ्याला वाटते की , मी उत्तमच लिहितो नि ते अत्यंत स्वाभाविक आहे. नुकतेच चालायला लागणाऱ्या मुलाला आपण विश्व जिंकल्यासारखे वाटते, तो सारखा

हसत सटतो व लक्ष वेधून घेऊन पाहतो . सगळ्यांनी आपले कौतुक करावे असे त्याला वाटते कारण तो पर्यंत त्याला माहित नसते की आपल्यापेक्षा मोठे व धावणारे लोक खूप आहेत .आणि हे कळायला त्याला फार दिवस लागतात .

तात्पर्य … आपणच आपले मुल्यमापन करून हुरळायचे नसते.

आधी साहित्य क्षेत्राचा नीट अभ्यास करायला हवा. म्हणजे..

अनेक लेखकांना वाचायला हवे. हे लेखक नीट समजले की,

कळते आपण तर इथे कुठेच बसत नाही . थोडी नाराजी येते,

पण आपण किती पाण्यात आहोत हे ही कळते .

तरी ही असे खूप लोक असतात की त्यांना समजते पण ते

मान्य करत नाहीत.येन केन प्रकारेण त्यांना समाज मान्यता

हवी असते. मोठेपण हवे असते, मिरवायला हवे असते. मग

ते कुठलाही विधी-निषेध न बाळगता आपली प्रसिद्धी कशी

होईल याच्या मागे लागतात.त्या साठी सर्व साहित्यिक नीती

मुल्यांची पायमल्ली करून पुढे जाण्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही इतकी प्रसिद्धीची त्यांची भूक वाढलेली असते.

तुमच्या साहित्यात साहित्यिक मुल्ये असतील तर कधी न

कधी ती प्रकाश झोतात येतातच ! पण आपली मुळी थांबायची तयारीच नसते.प्रसिद्धीचे भूत इतके मानगुटीवर

बसलेले असते की, आपण सवंगतेच्या पूर्ण आहारी जातो नि

इथूनच मग साहित्याचा बाजार सुरू होऊन विकणारे व विकत

घेणारे एकमेकांना भेटतात नि सुरू होते साहित्यातील बाजारूपण..! विकत घेणाऱ्यांच्या जाहिराती येतात व हापापलेले

साहित्यिक त्या जाळ्यात अलगद अडकतात. तुम्हाला इतकी

फी , इतके शुल्क भरावे लागेल असे निर्लज्ज पणे ही मंडळी

सांगतात. आणि तेवढे पैसे देऊन पुरस्कार विकत घेतले जातात.मला ही अशा विचारणा झाल्या होत्या. मी त्यांना खडसावून सांगितले की मी अजून एक ही पुरस्कार विकत

घेतला नाही , घेत नाही. एक तर कुठले डोंगा विद्यापीठ होते,

बाई म्हणाल्या ५०,००० खर्च करा. मी म्हणाले का करू?

तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे तर तुम्ही करा.. मला अशा

पुरस्कारांची अजिबात गरज नाही.

पण अशा लोकांना गिऱ्हाईके मिळतात ना ? मग त्यांचे फावते.

साहित्यिकांनीच अशा लोकांना चाप लावायला हवा . ते पुरस्कार देतो म्हणाले की, आम्ही हुरळतो नि पैसे देतो. आम्ही

दिलेल्या पैशातूनच आम्हाला शालजोडी द्यायची नि बाकी मग

तुंबडी भरायची. हा यांचा धंदाच झाला आहे.

 

कदम सरांनी म्हटल्या प्रमाणे, साहित्यिकाला पुरस्कार मिळाला की त्याचा हुरूप वाढतो हे खरे आहे. तरी नामांकित,

नावाजलेल्या व साहित्य क्षेत्रात मुरलेल्या संस्थांकडूनच

मिळालेल्या व पैसे न खाणाऱ्यांकडून पुरस्कार मिळाले तरच

लेखकाने धन्यता मानावी . तुमचे लेखन कसदार असेल तर

पुरस्कार तुमच्याकडे येतात , तुम्ही कुठे ही याचना करायची

गरज नसते. आपण लिहित रहावे , समाज मान्यता मिळतेच.

उताविळपणा करू नये हीच गोष्ट खरी आहे .

आधी आपण कसदार लिहावे. ते प्रसिद्ध करावे. हळू हळू

लोकांच्या लक्षात येते.. अरे..! चांगला लेखक आहे बरं हा!

आणि आपोआप तुमचे प्रसिद्धीचे वलय वाढत जाऊन तुमची

वाचक संख्याही वेगाने वाढत जाते. म्हणजे तुम्हाला समाज

मान्यता मिळते.व पुरस्कारही मिळतात. पण त्या साठी आपल्या हातून कसदार साहित्य निर्मिती होणे आवश्यक आहे.

इतरांच्या तुलनेत आपण कुठे आहेत हे आपल्याला चांगलेच

कळते ते कुणी ही आपल्याला सांगण्याची गरज नसते मग

कशासाठी अशा सवंग गोष्टींच्या मागे आपण लागायचे?

शेवटी काळच ठरवतो.. कोण श्रेष्ठ ते ….

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

दि : २८ फेब्रुवारी २०२२

वेळ : दुपारी १ : १२

प्रतिक्रिया व्यक्त करा