कणकवली :
गेली १८ वर्षे सातत्याने महिलांसाठी ‘आम्ही मिळून साऱ्याजणी’ हा महिला मंच महिला दिनानिमित्त आनंदोत्सव म्हणून साजरा करत आहेत. या वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री मंगल कार्यालय येथे केले आहे. यावेळी येथे २:३०ते ३:३० या वेळेत पाककला स्पर्धा होणार असून स्पर्धेतील अस्सल मालवणी म्हणजेच कोकणी पदार्थ, शाकाहारी, मांसाहारी गोड, तिखट असा कोणत्याही एकच पदार्थ घरी बनवून आणायचा आहे. या पदार्थांची सजावट सुद्धा मालवणी कोकणी गोष्टीने करावयाची आहे. चार्मिंग लेडीज स्पर्धा ही फक्त विवाहित महिलांसाठी असून स्पर्धेत भाग घेणार्या महिलांना आधी चार दिवस ट्रेनिंग दिले जाईल. भाग घेणार्या महिलांना वयाची अथवा इतर कोणतीही अट नाही.मात्र अगोदर नोंदणी आवश्यक असणार आहे. समाजासाठी आणि कुटुंबासाठी विशेष असे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, उद्योगिनी पुरस्काराचे वितरण महिलांचे विविध गुणदर्शन रेकॉर्ड डान्स, मिमिक्री, एकपात्री अभिनय, कविता, महिलांसाठी संदेश पर भाषण, उस्फूर्त प्रतिसाद याद्वारे सादरीकरण असे विविध मनोरंजनपर कार्यक्रम असणार आहेत.
मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे जागतिक महिला दिन ८ मार्च यादिनी दुपारी २:०० वाजल्यापासून हे कार्यक्रम असणार आहेत. महिलांनी महिलांसाठी उभ्या केलेल्या व्यासपीठाला सर्व महिला, भगिनी उपस्थित राहून आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आव्हान मिळून साऱ्याजणी यांच्यावतीने करण्यात आले आहे.