_*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री श्रद्धा सिंह यांचा अप्रतिम लेख*
*मी पाहिलेले पावसाळे*_
तुम्ही म्हणाल कि, हिवाळा का बरं म्हटले नाही ? तर मुळात इतकी थंडी भारतात अनुभवास येत नाही असे काहींचे मत आहे. पण “फर” म्हणजे जनावरांचे कातडीचे कपडे घालून सिमला कुलू मनाली मध्ये म्हणण्याची ही वाक्ये आहेत. थंडी म्हणजे काय हे अंगावर धड कपडा नाही, अर्धवट गळणारे छत किंवा गळकी कौले; धडपे लावून ठिगळे आणि छिद्र पडलेली चादर असलेल्या भिकारी किंवा गरिबाला विचारावे….
कि बाबारे ! इथे थंडी असते का? त्याचे उत्तर जे ते खरे मानावे असो. तर अशी थंडी काही मला अनुभवास आली नाही. म्हणून मी तसा उल्लेख केला नाही. थंडी हि हुडहुडी भरणारी, पांढऱ्या शुभ्र धुक्याची, आणि गरम वाफाळत्या चहाची असली तरीही, काही प्रदेशात ती मायनस आणि प्लस डिग्री सेंटीग्रेड असते असे मी ऐकले आहे खरे…
मग पावसाळे म्हटले कि काय सांगावे?
*अनुभवी पाऊस*
तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेत म्हणावे तर पावसाळा पाहण्यात मजा ती काय? असा प्रश्न मला पडतो. पावसाळा हा अनुभवाला जोडला जात असला तरी जास्त पावसाळे म्हणजे जास्त अनुभव हे तरी कसे मानावे? कारण अनुभव घेणे हि एक प्रकारची सवय आहे.
तुम्ही म्हणाल कि छे! असे काही आमच्या ऐकिवात नाही. परंतु अनुभव घेणे, असणे हे जागृत अवस्थेचे लक्षण आहे. अनुभव म्हणजे स्मरण असणे, ज्ञान आणि तत्वज्ञान यातील फरक जाणणे, अनुभव म्हणजे जे घडले ते, जे घडते ते; त्या सर्व गोष्टींना साक्षी असणे. मग असा पावसाळा कोणाला आठवतो का? सांगता येतो का? व्यक्त करता येतो का?
तर तो खरा वर्षाव ठरेल.
*शास्त्रीय पाऊस*
अन्यथा ढगांतून पाणी बाष्पीभवनाने जमिनीवर कोसळते आणि पाने झाडांवर किंवा नदी नाल्यांतून वाहत जाते, आणि अखेरीस सागराला मिळते. इतके शास्त्रीय महत्त्व आहे पावसाचे नाही का? शास्त्राच्या प्रयोगाचा साहित्याशी फक्त चंचूप्रवेशाइतका सुद्धा संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही. तसे होणे केवळ अशक्य. त्याबाबतीत शास्त्रीय उपकरणे आणि साहित्य काव्यप्रणाली यांची नाळ काही केल्या जोडली जात नाही.
*साहित्यातला पाऊस…*
बालकवींच्या मनापासून ते आमच्यासारख्या नवशिक्या लहान कवीं-कवयित्रीपर्यंत सर्वांना नखशिखांत चिंब भिजवतो. रिपरिप, रिमझिम,झरझर, टपटप, भुर्रभुर्र, धपधप, अशा कितीतरी आवाजात आम्ही मंदिराच्या छपरांवरचा पाऊस ऐकला आहे. जणू काही पाऊस “मी आलो” अशी साद घालतच असतो.
या पावसाला कुणी देवाची अश्रुधारा मानते तर कोणी निसर्गाचा प्रकोप म्हणते. मला तरी पाऊस म्हणजे मायेचा ओलावा,नवीन कोवळ्या गवताच्या पात्यावरील दवबिंदू, किंवा –
अंकुरीत झालेल्या इवल्याश्या रोपट्याशी सलगी करणारी हलकीशी सर’ अशा स्वरूपात कैद करावासा वाटतो.
दाटून येणारे मेघ आणि दाटून येणारा कंठ म्हणजे सुख दुःखाचे दोन विरुद्ध संकेत आहेत.
*बालपणीचा पाऊस*
पहिल्या पावसाबरोबर आता आंबे खायला न मिळणे पासून ते आता दिवशी भिजत शाळेत जावे लागेल इथपर्यंत अनेकानेक आठवणींनी माझा कंठ कित्येक वेळा दाटून आला आहे.
पाण्याचे थेम्ब, ओहोळ आणि ओहोळाच्या पाटाचे पाणी वाहू लागले कि त्यात “कागदी होड्या सोडणे” या लहानपणीच्या छंदाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पण खरा बालपणीचा पाऊस मला आठवतो तो चिखलमय झालेल्या खळग्यात “धपाक-छपाक” आवाजात नाचताना ! पावसात चिंब भिजून पहिल्या शिंकेचा !! अशा दिवसात जाहिरातीत दाखवितात अगदी तस्से सर्दी पडसे आम्हाला झाले आहे. आमच्या १०X१२ च्या खोलीत हि अशी आजारपणे अनेक वेळा निघाली, बरी झाली.
‘ये रे ये रे पावसा, तूला देतो पैसा’ असे म्हणत ‘ आई,मला पावसात जाऊ दे’ असा प्रेमळ हट्ट हि करायला लावणारा पाऊस. नेहमी हवासा वाटतो. पण मनामध्ये मात्र पाऊस आठवतो, राहतो अगदी दरवळत्या मृदगंधामुळे! पाऊस हि नवसृष्टी,नवचैतन्याची ती खूणगाठ आहे हे निश्चित.
मग तरीसुद्धा
*स्मरणातील पाउसाबद्दल*
काय सांगता येईल? तर-
सोसाट्याचा वारा येताना धावत जाऊन आणलेले अंगणात वळणारे कपडे किंवा अभ्यासाची पुस्तके घरात आणणे.
जांभळाची फांदी, नारळाची झावळी किंवा नेमका नारळ आपल्याच डोक्यात पडले तर? अशा बालिश भीतीमध्ये घालवलेली अंगणातील संध्याकाळ,
स्टीलच्या भांड्यात गारांचा वर्षाव गोळा करणे
गळक्या पत्र्यातून थेंब थेंब पडणारे पाण्याचे बिंदू मोजणे.
कपाळावरून पुढे डोकावणारी रेनकोटची टोपी घालून शाळेत जाणे,
दप्तराच्या कडेनी पाणी आत जाऊ नये म्हणून दुधाच्या पिशव्यांची कव्हरे लावणे
किंवा रेनकोटच्या आत दप्तर लपवणे आणि स्वतः भिजत जाणे.
फूटपाथावर आणि नदी पुलांवर साठलेल्या पाण्यातून वाट काढत जाणे.
पाऊस थांबताना बदलत जाणारे आभाळाचे रंग पाहणे.
ढगांवर आलेली चंदेरी किनार आणि सूर्याच्या विरुद्ध आवासून उमटणारे इंद्रधनुष्य
वळचणीला बसणारी कबुतरांची जोडी किंवा अंगावर शहारे आणून रस्त्यावरून एकटेच फिरणारे भेदरलेले कुत्र्याचे पिल्लू.
सृष्टीच्या तांडवापुढे आपापल्या परीने नतमस्तक होणारी ही निसर्गाची रूपे अनुभवणे.
_हेच सर्व आहेत मी पाहिलेले पावसाळे!_
सौ. श्रद्धा दीपक सिंग
MBA (IB),
कवयित्री, कीर्तनकार
जागतिक साकव्य विकास मंच सदस्य
स्थान : पुणे
दिनांक: २३/०१/२०२२
(संवाद मीडिया करता लेखन)