*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखक कवी श्री विनय सौदागर यांचा महाशिवरात्रीचे महत्त्व विशद करणारा लेख*
*महाशिवरात्र*
मराठी महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला शिवरात्र म्हटली जाते. यात माघातल्या शिवरात्रीला विशेष महत्व दिलय. तिला आपण ‘महाशिवरात्र’ म्हणतो. गणपतीचा उत्सव असतो, दुर्गेचा असतो, लक्ष्मीचा असतो, दत्ताचा असतो, कृष्णाचा असतो; तसा हा शंकराचा..महादेवाचा उत्सव.
मुळात ‘जीव आणि शिव’ , ‘शिव आणि शक्ति’, ‘शिव आणि पार्वती’ या द्वयींत माझा प्रचंड गोंधळ उडतो. ‘शिव म्हणजे ब्रह्म’ आणि ‘शिव म्हणजे शंकर’ यात समजुतीची गडबड होते. या शिवाशिवीच्या व्यापात नेमक्या अर्थाचा भोज्ज्या काही हाताला लागत नाही. असो, नाहीतरी जीवनात काय हाताला लागतंय, ते तरी समजतं कुठे?
महाशिवरात्र म्हटली की, माझ्या डोळ्यासमोर तीन गोष्टी येतात. एक.. उपवास, दोन.. महादेवाच्या मंदिरात जाणं आणि तीन..तुळशीत गळती बांधणं. यातील तिसरं सगळ्यात महत्वाचं, कारण हे मीबालपणापासून बघत आलोय, करीत आलोय.
आमच्या घरी हे उपवास म्हणजे एकदम कडक वगैरे असे काही नव्हते, आता तर नाहीच नाही. पण या दिवशी मुलूखात हिंदू धर्मीय कुणी मासे खात नाहीच, महत्वाचे म्हणजे भातही जेवत नाही. कोकणात भात आणि मासे खाल्ले नाही म्हणजे, उपवास झाला असे म्हणायला काहीच हरकत नसावी. अगदी ए ग्रेडचा नसेल, पण सी ग्रेडचा उपवास म्हणून तरी या गोष्टीला कोकणात मान्यता मिळण्यास हरकत नसावी.
आमच्या गावात दोन शिवमंदिरे आहेत. एक सर्वेश्वर ,तर दुसरा रामेश्वर. बहुतेक शिवलिंगाचा गाभारा हा जमिनीच्या खालचा स्तरावर असतो.आमच्या घराजवळच्या महादेव मंदिरातील शिवलिंगही जमिनी खाली दिसते, पण रामेश्वर मंदिरातील शिवलिंग मात्र जमिनीवर. लोक दोनही मंदिरात या दिवशी दर्शनाला जातात.
रामेश्वर मंदिर परिसर मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूला सुमारे तीस फूट खाली रामेश्वर ,तर समोरच रस्त्याच्या उजव्या बाजूला तीस फूट उंचीवर वाहती गंगा. मंदिराच्या समोर सुमारे साठ- सत्तर फूट उंचीवर बारमाही ही गंगा प्रवाहित असते. लोकानीही मूळ ढाचा न बदलता हे जतन केलंय. आम्ही या परिसराला ‘गंगेचा आडवान’ असे म्हणतो. लोकांचा हा कौतुकाचा व श्रद्धेचा विषय आहे.
तिसरी गळतीची गोष्ट अत्यंत महत्त्वाची. सगळे लोक तुळशी वृंदावनात ही गळती बांधतात. यासाठी सर्वसाधारण मकरसंक्रांतीत उपलब्ध झालेली मातीची भांडी (सुघड, चिलीपिली) वापरली जातात. मातीच्या छोट्या मडकीच्या तळाला भोक पाडून त्याचे अभिषेक पात्र बनवतात. पूजेवेळी त्यात पाणी घालतात.
मला ही ठिबक सिंचनाची कृती वाटते. महाशिवरात्री दरम्यान उन्हाळे सुरू होतात, तेव्हा ही योजना असावी. कदाचित आपले पूर्वज सर्व झाडांच्या मूळात अशी व्यवस्था करीत असावेत. आपण त्याचे शास्त्र बनवून ते तुलसी पूरते सिमीत करून टाकले असावे.
या महाशिवरात्री संदर्भात अनेक पौराणिक कथा आहेत. एक महारोगी स्त्रीने फेकलेले बिल्वपत्र शंकराच्या पिंडीवर पडल्याने आणि महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास घडल्याने, तिला स्वर्गात स्थान मिळाले; एका कुत्र्याने शिवरात्री दिवशी अजाणतेपणी शिवलिंगाला प्रदक्षिणा घातल्याने त्याला मुक्ती मिळाली. अशा स्वरूपाच्या अनेक कथा आहेत. सदाचाराने जीवन व्यतित करणाऱ्या साध्या माणसांना अश्या इश्वरीय गोष्टीवर विश्वास ठेवून आनंदाने जगताना पहाताना मला व्यक्तच होता येत नाही. मी त्यांच्या श्रद्धास्थानाला धक्का लावू इच्छित नाही; तसेच जे बुद्धीवादी आहे, त्यांचेही ऐकून घेतो. या दोन्हीच्या मधे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत रहातो.
‘शिवलिंग’ हे सृजनत्वाचे प्रतिक आहे, ‘शिवपिंडी’ ही अणुभट्टी चे प्रतिक आहे, असेही म्हटले जाते. कोणताही इझम न बाळगता या विषयी अभ्यास व्हावा ,असे मला मनोमन वाटते. डोक्यात धार्मिकता वा नास्तिकता न ठेवता आपल्याला विचार करता येईल का?, असा प्रश्न पडतो.मग या वैचारिक गोंधळात ‘शिवशंकराने डोक्यावर घेऊनही बाहेर झेपावणाऱ्या गंगे प्रमाणे’ मी माझ्यापासून दूर पळतोय , ही जाणीव होते आणि मी सावध होतो.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802